पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/104

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
ग्रामीण वर्तमानाच्या कथा



ना. धों. महानोर


 अर्वाचीन मराठी साहित्यात गेल्या शंभर सव्वाशे वर्षांच्या इतिहासावर नवनवे विषय, माणसामाणसांचे संबंध, प्रेम, दुःख, राष्ट्रीय भावनेने, ध्येयवादाने आलेलं साहित्य, दु:खाचा आगडोंब आणि सुंदर असं हिरवं संपन्न जग खूप आलं. कथा, कविता, कादंबरी, ललित लेखन, नाटक आणि त्याची समीक्षा खूप खूप मराठी साहित्य व शाखा समाजासाठी देऊन गेली. दर एक पंचवीस वर्षांनी बदल नवं होत जाणारं साहित्य, परिवर्तन - होणारी शहरांकडून शिक्षणानं थेट खेड्याकडे आलं. जे जीवन खेडी - शेतीवाडी, दुष्काळ, पाणी आणि तिथल्या माणसांची व्यवस्थेची होणारी फरफट भक्कम व चांगल्या कसदार वाणानं उभी राहिली. अगदी वाड्यावस्ती, खेड्यातला, त्याच्या भवतालचा लेखक त्या जीवनाचं वास्तव साहित्यातून अधोरेखित करीत राहिला. मराठी साहित्यातील सगळ्यातच वाङ्मय हे ठळकपणानं व असामान्य प्रतिभेनं उभं राहिलं. या लेखकांच्या साहित्यानं खेड्यांसह शहरातील लेखकसुद्धा चकित झाला. तो ते वाचकांना आणि उघड्या डोळ्यांनी ते जग पाहतांना प्रसन्न झाला. खूप दुःखीही झाला. आपल्याला या कृषी केंद्रित खेड्यांच्या विशेषत: दुःखाला काही आधार देता येईल का? सामाजिक संस्थामार्फत शासनाकडून काही प्रमाणात दुःखाचं सावट निपटता येईल का? म्हणून कात टाकून उभाही ठाकला हे मी पाहतो आहे. र. वा. दिघे पाणकळा ‘पड रे पाण्या', व्यंकटेश माडगूळकरांचं बनगरवाडी माणदेशी माणसं व एकूण साहित्य, शंकर पाटलांचं टारफुला आणि मनाला उद्ध्वस्त करणाऱ्या भुजंग - वेणा सारख्या कथा, उद्धव शेळके यांच्या धग - शिळात कथा कादंबरी, शंकरराव खरात यांचे लेखन अशी पंचवीस तीस तरी नावं घेता येतील, त्यांच्या ग्रामीण जीवनाच्या थेट तळाला हात घालून लेखनातून समाजासमोर उभं केले. विशेषत: या तीस पस्तीस वर्षांच्या काळात हे अधिक तीव्रतेनं, डोळसपणानं नव्या लेखनामधून दिसून येते. प्रत्यक्ष त्या जीवनाचा सांधा त्याच्या सुख दु:खाचा पीळ यात

अन्वयार्थ □ १०५