पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/९६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रमुख कारण स्रियांची दुर्दशा हेच आहे. त्यामुळे देशात सामाजिक असमतोल निर्माण झाला. तसेच महिलांच्या स्वातंत्र्यामुळे अनेक जुन्या चालीरीती मोडीत निघाल्या आणि या चालीरीतींवर ज्यांची सुरक्षा अवलंबून होती, त्यांना बदलत्या परिस्थितीशी जमवून घेणं अवघड झालं. त्यामुळे कौटुंबिक व सामाजिक ताणतणाव निर्माण झाले. तथापि, दीर्घकालीन विचार करता महिलांच्या स्वातंत्र्याचे सुपरिणाम दुष्परिणामांपेक्षा अधिक आहेत. मात्र हे पटण्यासाठी काही कालावधी जाणं आवश्यक आहे. उद्योगांमधील व्यवस्थापकांच्या स्वातंत्र्याबाबतही हेच म्हणावं लागेल.

 या मुद्यांचं तात्पर्य काय तर, मानसिकता बदलणं हा कासवाचा गरुड होण्याचा सर्वोत्तम उपाय आहे हे व्यवस्थापकांनी ध्यानात घ्यावंं. हे ध्यानात आणून देण्याचे उपक्रम संस्थांनी हाती घ्यावेत. ज्या संस्थांनी यापूर्वीच ते हाती घेतले आहेत त्यांनी ते अधिक जोमाने राबवावेत. वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा मोडणं म्हणजे आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतल्यासारखंं आहे, ही भावना मनातून काढून टाकावी आणि स्वत:साठी प्रगतीचे नवनवे पर्याय नेहमी खुले ठेवावेत हाच नव्या काळाच संदेश आहे.

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/८७