पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/८७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कोण?) इतरांपेक्षा आपण बॉसच्या जवळचे आहोत. आपल्याशिवाय बॉसचे पान हलत नाही. इतरांचीही कामं आपण बॉसकडून करवून देऊ शकतो, असा भाव आपल्या सहकाऱ्यांंकडे मारणं, आणि त्यांचा जळफळाट करणंं, हे असुरी समाधानही चमच्यांना मिळत असतं. दुसच्यांच्या मनात आपल्याबद्दल मत्सर निर्माण करणं हा अनेकांना छंदच असतो. तो चमचेगिरीच्या माध्यमातून पुरेपूर भागतो.
 आणखी एक उदाहरण पाहा. पुण्याला रविवारी वन डे क्रिकेट मॅच आहे. त्याच वेळी कंपनीचं पुण्याला काही काम आहे. चमचा बॉसला सांगेल, त्या कामासाठी मला पाठवा. मी शनिवारी जातो.माझ्या नातेवाईकाने क्रिकेट मॅचचे तिकीट काढलं आहे.पुण्याला जातोच आहे,तर मॅचही बघून येईन.बॉसही विचार करेल, कुणाला तरी या कामासाठी पाठवायचचं आहे, हा गेला म्हणून काही बिघडणार नाही. तो परवानगी देईल. मग चमचा या प्रकाराची आपल्या सहकाच्यांमध्ये जाहिरात करतो.
 कंपनीच्या प्रवास खर्चाने आपल्याला मॅच बघायला मिळणार. कारण बॉसने या कामासाठी आपली निवड केली आहे, असं तो ज्याला त्याला सांगून आपले महत्व वाढविण्याचा प्रयत्न करतो. इतरांना खरी बाब माहिती नसल्याने त्यांच्या ठायी चमच्याचा भाव वधारतो. अशा प्रकारचे छोटे छोटे फायदे चमच्यांना मिळू शकतात.

तात्पर्य:
 बॉसचे चमच्याकडून दोन फायदे असतात. एक गुप्त माहिती, दोन खुशमस्करी. तर चमच्याचे बॉसकडून दोन फायदे असतात, एक सहकाऱ्यांत भाव मारण्याची संधी व दोन, छोट्या छोट्या सवलती. जोपर्यंत बॉस व चमचा यांच्यात हा अलिखित करार चालू राहील तोपर्यंत ती पूर्णपणे नाहीशी करणंं अशक्य आहे.मात्र कंपनीच्या कारभारात पारदर्शकता ठेवणंं व सर्वाशी मुक्त संपर्कात असणंं या मार्गाचा अवलंब करून व्यवस्थापन चमचेगिरी नियंत्रणाखाली ठेवू शकते.

चमचेगिरीचा वापर /७८