पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/८४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कृतीबाबत ऑफ द रेकॉर्ड माहिती दुसऱ्या सुनेला विचारली. हिला आपण सगळंं सांगितलं आणि तिनं पदार्थ चांगला बनवला तर ती सासूबाईंंची लाडकी बनेल आणि आपलं महत्त्व कमी होईल, असा स्वार्थी विचार करून दुसच्या सुनेने चुकीची किंवा हातचे राखून माहिती दिली, तर काय होईल? पदर्थ चांगला होणार नाही. यात केवळ नव्या सुनेनंंच नुकसान नाही, तर त्या संपूर्ण ‘घर’ या संस्थेचंही नुकसान आहे. कारण एका पदार्थाबाबत दाखविलेला ‘स्वार्थ’ अन्य ठिकाणीही प्रगट होईल व घराच्या एकतेला तडे जातील.
 वरील उदाहरणांचं तात्पर्य असं की, चमचेगिरी म्हणजेच अधिकार नसताना व संबंधित व्यक्तीची अनुमती नसताना त्याच्याबद्दलची खासगी माहिती वरिष्ठांना देणंं हे तत्त्वत: अनैतिकच आहे. मात्र, अशा पध्दतीने माहिती देणं वा घेणं हे केवळ संस्थेच्या हितासाठी असलं तर त्याचा फायदा संस्थेला होऊ शकतो. मात्र हीच कृती व्यक्तिगत स्वार्थासाठी केली तर संस्था कोलमडू शकते. अशी नकारात्मक ‘चमचेगिरी’ हे बलाढ्य मोगल साम्राज्याच्या पतनाचं एक महत्त्वाचंं कारण आहे.

 थोडक्यात, चमचा’ आपल्या तोंडात विषही भरवू शकतो किंवा बलवर्धक खीरही भरवू शकतो. काय भरवून घ्यावयाचंं आणि किती प्रमाणात याचंं तारतम्य व्यवस्थापनाने दाखवायचं असते. लौकिक अर्थाने चमचेगिरी समर्थनीय नाही. पण व्यवस्थापनाच्या दृष्टीने ती एक व्यवहारी व न टाळता येण्यासारखी अपरिहार्यता आहे, आणि एकदा ती पूर्णपणे टाळता येत नाही, असं दिसून आल्यावर तिचंं सुयोग्य व्यवस्थापन करून तिच्यातील दोष कमीत कमी राखण्याचंं कौशल्यपूर्ण काम व्यवस्थापनाला करावं लागतं. पुढील लेखात चमचेगिरीच्या अन्य गमतीशीर बाबींवर विचार करू.

अद॒भुत दुनिया व्यवस्थापनाची/७५