पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/८२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तक्रार ऐकून मी त्याला हळूच विचारलं.
 “का हो, तुम्हाला तीन वर्षांपूर्वी प्रमोशन मिळालं असं ऐकतो. ते कसं मिळालं बुवा.?”
 “त्यावेळी चमचेगिरी नव्हती. गेल्या अडीच दोन वर्षातच हा प्रकार वाढलाय.वैताग आलाय नुसता,” तो उत्तरला.
 मी विषय बदलला.
 आपल्या सहकाऱ्यांंच्या चहाड्या आणि त्यांच्याबाबतची माहिती गुप्तपणे वरिष्ठांपर्यंत पोहोचविणंं यालाच सर्वसाधारणत: चमचेगिरी म्हणतात. ही एक प्रकारची हेरगिरीच असते. या प्रकारापासून जगातील कोणतीही संस्था अलिप्त नाही. त्यामुळेच त्याचा व्यवस्थापकीय दृष्टिकोनातून गंभीरपणे विचार करणंं भाग पडतं.
 वास्तविक (स्वतःविरुध्दची) ‘चमचेगिरी’ कुणालाच आवडत नाही. ती एक अनैतिक गोष्ट मानली जाते.‘चमचा’आपल्या सहकाऱ्यांंच्या हेटाळणीचा विषय बनतो.ते त्याचा तिरस्कार करतात. त्याच्यावर जळफळतात.अपशब्द वापरतात.पण हे सर्व त्याच्या अपरोक्ष.कारण समोरासमोर चमच्याला जाब विचारला तर बॉस दुखावेल ही भीती असतेच. मग इतकी अप्रिय असणारी ही चमचेगिरी केली का जाते आणि चालूू को दिली जाते या प्रश्नांची उत्तरे संस्थेच्या कार्यपध्दतीत दडलेली असतात.
 चमचेगिरी म्हणजे काय, चमचा कोण असतो, चमचेगिरीचा संस्थेच्या दृष्टीने फायदा असतो का, चमचेगिरी चालूू द्यायची की नाही आणि दिलीच तर कोणत्या थरापर्यंत आणि कोणत्या बाबतीत. या प्रश्नांचा विचार व्यवस्थापनाला करावाच लागतो.एका परीने ‘चमचेगिरी'चं व्यवस्थापन कसंं करावं याचंं धोरण ठरवावं लागतं.
 ‘चमचा’ या शब्दाचा उगमही मजेशीर आहे. रोजच्या व्यवहारात चमचानामक वस्तूचा उपयोग पदार्थ तोंडात भरविण्यासाठी होतो. त्याचप्रमाणे वरिष्ठांना माहिती ‘भरविणारा’ तो चमचा अशा अर्थाने हा शब्द रूढ झाला आहे.
 चमचेगिरीचे दोन पैलू असतात.एक माहिती पुरविणे व दोन,खुशमस्करी करणं, आणि दोन्ही पैलूंंच्या सकारात्मक व नकारात्मक अशा दोन बाजू असतात.वानगीदाखल एक उदाहरण बघू.

 सुशिक्षित गृहिणींना पुस्तकावरून खाण्याचे पदार्थ बनविण्याचा छंद असतो.पण कित्येक पुस्तकांत दिलेल्या माहितीबरहुकूम पदार्थ बनवला तरी तो अपेक्षेइतका चांगला होत नाही.कारण पुस्तकातील माहिती अचूक असली तरी ढोबळ असते. दोन चमचे तिखट घाला अशी सूचना असली तरी तिखटातही कमी तिखट व जास्त तिखट असे प्रकार असतात. सपक मिरचीचे तिखट असेल तर तीन चमचे घालावे लागेल,प्रसिद्ध

अदभुत दुनिया व्यवस्थापनाची /७३