पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/७९

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


टक्के पगार जास्त आहे असं का असावं? तो पुरुष आहे म्हणून?
 उत्तर : आपली शंका बरोबर असण्याची शक्यता आहे. आपल्या समाजपद्धतीत पुरुषाच्या कार्यक्षमतेवर अधिक विश्वास टाकला जातो. साहजिकच काम समान असलं तरी त्याला फायदे जास्त मिळतात, पण आपण ही स्थिती कौशल्याने हाताळली पाहिजे. प्रथम आपण मन लावून काम करून संस्थेच्या फायद्याची एखादी कामगिरी करून दाखवावी. साहजिकच तुमचा बॉस तुमचे कौतुक करेल.त्यानंतर शांतपणे त्याच्यासमोर तुमची बाजू मांडावी. ‘आपण माझे कौतूक केलेत या बद्दल मी आभारी आहे .पण हे कौतुक माझ्या पगाराच्या चेकमध्ये कुठे आढळून येत नाही. मी माझ्या कर्तृत्वाने ही परिस्थिती बदलणार आहे, महिला म्हणून मला कोणतीही सवलत किंवा अतिरिक्त फायदे नकोत, पण माझ्या पुरुष सहकाऱ्याइतकंच काम तेवढ्याच तडफेने मी करत असल्याने मला मिळणारी परतफेडही तेवढीच असेल यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे, अशा मोजक्या पण नेमक्या शब्दांत तुमचा आत्मविश्वास व भावना बॉसच्या निदर्शनास आणा. तुमचं काम होण्याची ९० टक्के शक्यता आहे.
 प्रश्न : माझा पुरुष बॉस कंपनी सोडून निघाला आहे. त्याच्या जागी माझी नेमणूक होण्याइतकी माझी सर्व बाबतीत पात्रता आहे. पण कंपनीला त्या जागी पुरुषच हवा आहे, मी काय करावं?
 उत्तर : आपण कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापकांशी संपर्क साधा. रिकाम्या होणाऱ्या जागेवर काम करण्याची तुमची इच्छा आहे आणि पुरेपूर पात्रताही आहे याची जाणीव त्यांना करून द्या. हे पद मलाच मिळेल अशी अपेक्षा आहे असं त्यांना कळवा. इतक करूनही तुम्हाला डावलण्यात आलं, तर मात्र त्याच कंपनीत खितपत राहू नका.तुमची गुणवत्ता व पात्रता श्रेष्ठ असेल, तर तुम्हाला अधिक मोकळे व न्याय्य वातावरण असणाऱ्या कंपनीत जरूर संधी मिळेल.तो पर्याय स्वीकारण्याची तयारी करा.
 प्रश्न : माझ्या कंपनीत मी एकटीच उच्चपदस्थ महिला व्यवस्थापक सर्व पुरुष आहेत. संचालक मंडळाच्या बैठकीत कंपनीचे अध्यक्ष मी उच्चपदस्थ अधिकारी असूनही मला ‘मिनिट्स' नोंदविण्यास सांगतात.हा माझा अपमान नव्हे का?
 उत्तर : अपमान वाटून न घेता अध्यक्ष सांगतात त्याप्रमाणे 'मिनिट्स' नोंद करा.पण अशा पध्दतीने की, बैठक कितीही वेळ चालली तरी तुमची मिनिट्स एका पानात संपली पाहिजेत. यावरून तमचे अध्यक्ष काय ओळखायचं ते ओळखतील.(या मार्गाचा अवलंब करून एका महिला संचालकाने कंपनीचे अध्यक्षपद पटकावल्याची सत्यकथा मला माहीत आहे.)

 प्रश्न : माझ्या कंपनीच्या कामासाठी मला काही वेळा रात्री प्रवास करावा लागतो.याबाबत माझे पती व मुले नाराज असतात.

महिलांच्या यशाचे रहस्य/७०