पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/७३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असेल. तेव्हा त्याला माझ्यापेक्षा खूपच जास्त माहिती असणार. मला त्याच्याकडून शिकण्यासारखं बरंच काही असेल, पण आज जेव्हा २२-२४ वर्षांचा इंजिनिअर कामाच्या ठिकाणी प्रवेश करतो, तेव्हा त्याला वाटतं, हा अर्ध्या वयाचा म्हातारा येथे काय करतोय? त्याने आपलं शिक्षण ३० वर्षांपूर्वी घेतलं असणार! त्यामुळे त्याचं ज्ञान निरुपयोगी आहे, अशा तऱ्हेने गेल्या दोन पिढ्यांच्या कालावधीत अनुभव या संकल्पनेचं वजन कमी होत गेलेलं दिसून येतं.
 व्यवस्थापन शैलीलाही या बदलांचा स्वीकार करावा लागत आहे. आज कित्येक कंपन्यांमध्ये आपण पाहतो की, ४०-५० वर्षांच्या जुन्या पिढीला मागे सारून तरणेबांड, नवशिके पदवीधर तरुण वरच्या जागा मिळवत आहेत. ‘जुनं ते सोनं’ या म्हणीची जागा ‘नवं ते गोमटं’ या नव्या म्हणीने घेतली आहे.
 स्त्री व पुरुष यांनी एकत्र काम करण्याबाबतही परिस्थितीत बराच बदल घडला आहे. सुरक्षा क्षेत्राचं उदाहरण पाहिल्यास असं दिसून येईल की, पूर्वी पोलीस आणि लष्कर हे विभाग पुरुषांसाठी राखीव होते. आता महिलांनी या क्षेत्रावर धाड घालून धडाधड घुसखोरी केली. काही वर्षांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या एखाद्या बैठकीत पुरुषांपेक्षा महिला अधिक असल्याचं पाहावयास मिळालं तरी आश्चर्य वाटावयास नको. (महिला या नैसर्गिकरीत्याच जास्त संशयी असल्याने लष्कर व पोलिसांत अधिक चांगली कामगिरी करू शकतील हा भाग सोडून देऊ.)

 करिअरच्या क्षेत्रांमध्ये महिलांच्या वाढत्या संख्येची दखलही आधुनिक व्यवस्थापनाला घ्यावी लागत आहे. महिला व पुरुष यांच्या स्वभावात फरक असल्याने त्यांच्या कार्यपध्दतीतही भिन्नता असते. महिलांची शारीरिक शक्ती पुरुषांपेक्षा कमी असली तरी एकाग्रता अधिक चांगली असते. त्यामळे तशा पध्दतीच्या कामांमध्ये महिला पुरुषांवर बाजी मारतात. शिवाय महिला पुरुषांपेक्षा जास्त भावूक व संवेदनशील असतात. या त्यांच्या गुणांचा वापरही करून घेतला जाणं आवश्यक आहे. त्यामुळे व्यवस्थापनाने महिला व पुरुष यांच्यात कामाचं वाटप करताना त्यांच्या नैसर्गिक प्रवृत्तीचा विचार केला तर अधिक फायदा होऊ शकतो.

व्यवस्थापन पध्दतीतील बदल /६४