पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/७२

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


'तू मध्ये तोंड घालू नको, तुला काय समजतं?’ हा प्रश्न आज मध्यम वयाच्या असणाऱ्या प्रत्येकाने लहानपणी कित्येकदा ऐकलेला असतोच. याचाच अर्थ शहाणपण हा वयावर अवलंबून आहे असं समजण्याचा तो काळ होता. चूक की बरोबर हे ठरविण्याचा मुख्य निकष ‘वय’ हाच होता. पण गेल्या दहा-पंधरा वर्षांत ही संकल्पना बरीच मागे पडली आहे.
 मुलांच्या संगोपनासाठी नव्या तंत्राचा वापर बहुतेक सुशिक्षित घरांमध्ये होतो. वयाने थोडीशी जाणती झालेली मुलं आई-वडिलांसमोर आपली मतं मांडण्यास कचरत नाहीत आणि आई-वडिलही त्यांना हटवत नाहीत. मुलांना धाकात ठेवणं म्हणजेच शिस्त हा समज मागे पडून मुलांना ठराविक मर्यादेपर्यंत निर्णय स्वातंत्र्य देणं व त्यांच्या व्यक्तिमत्वाचा स्वतंत्रपणे विकास होईल, असं वातावरण घरात राखण्याचा प्रयत्न आधुनिक आईवडिलांकडून जाणीवपूर्वक केला जातो. मुलांच्या चुका मार, बडव किंवा शिक्षा करून सुधारण्यापेक्षा समजावून सांगून सामोपचाराच्या मार्गाने त्याची जाणीव मुलांना करून देण्याची पालकांची हल्ली धडपड चालू असते.
 उद्योग क्षेत्रातही याच कालावधीत नेमके हेच बदल होत आहेत. कर्मचारी हा वेठबिगार मजूर नसून संस्थेचं एक महत्त्वपूर्ण अंग आहे. त्याला त्याच्या भावभावना, रागलोभ, समस्या असून त्यांचा त्याच्या कार्यशक्तीवर परिणाम होतो. त्यामुळे व्यवस्थापनाने त्याचा मान राखून काम करून घेणं व केवळ शिस्तीच्या चौकटीत त्याला कोंबण्यापेक्षा त्याला निर्णय स्वातंत्र्य देऊन त्याचा आत्मविश्वास वाढविण्याकडे लक्ष देणं अगत्याचं समजलं जातं.
 व्यवस्थापन पध्दतीत झालेल्या बदलांचे काही पैलू पुढीलप्रमाणे आहेत-
 १. तरुण पिढीची बदलती मनोवृत्ती, २. स्त्री व पुरुष यांनी एकत्र काम करणे.
 तरुण पिढीच्या बदलत्या मनोवृत्तीचा संबंध ‘जनरेशन गॅप ' किंवा दोन पिढ्यांतील वैचारिक फरक याच्याशी आहे. तसे पाहता प्रत्येक दोन पिढ्यांमध्ये हा फरक असतोच, पण गेल्या पंचवीस वर्षांत तो इतका वाढला आहे की, त्याच्याशी जमवून घेणंं कित्येकदा अवघड जातं. मी लहान होतो तेव्हा सर्व शहाणपण आपल्या वडिलांकडेच आहे अशी माझी समजूत होती. वडिलांना जे माहीत नाही ते कुणालाच माहीत नसणार याची खात्रीच होती. आज माझ्या छोट्या मुलाने मला एखादा प्रश्न विचारला आणि मी त्याच बरोबर उत्तर दिले की, बाबांनासुध्दा हे माहिती आहे की, असे उद्गार मुलं काढतात. मी मुलांची परीक्षा घेण्याऐवजी मुलचं माझी परीक्षा घेतात.

 मी इंजिनिअर झाल्यानंतर पहिला ‘जॉब’ स्वीकारला तेव्हा माझ्या पन्नाशीतल्या व्यवस्थापकाकडे पाहून मला वाटलं, या माणसाने इथे ३० वर्षे तरी नोकरी केली

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/६३