पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/७०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

विक्री विभाग, अंतर्गत व्यवस्थापन विभाग, मनुष्यबळ विभाग, इतकंच नव्हे तर अकौंटंट्स विभागापर्यंत जाऊन पोचते. पर्यायाने संपूर्ण कंपनी या संशोधनात गुंतली जाते. जसं घरात लहान मूल जन्माला आल्यानंतर केवळ त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करणंं, म्हणजे त्या मुलाचंं योग्य 'व्यवस्थापन’ असं म्हणता येत नाही. त्याची स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, करिअर या सर्व बाबींचा विचार व तरतूद त्याच्या व्यवस्थापकांना म्हणजे आईवडिलांना करावी लागते आणि ही सर्व कामं आई-वडील एकट्याच्या जिवावर करू शकत नाहीत. त्यांच्या नोकरांचीही त्यात महत्त्वाची भूमिका असते. केवळ ते नोकर आहेत म्हणून त्यांचं घरातील स्थान कनिष्ठ आहे असं म्हणून त्यांच्या रचनांकडे किंवा योगदानाकडे दुर्लक्ष करणं मुलाच्या हिताच्या दृष्टीने अपायकारक ठरू शकतं. मुलाला काही अपघात किंवा आजार झाला आणि अचानक उपचारांची आवश्यकता लागली तर काही वेळा घरातला अनुभवी नोकर त्यावर रामबाण उपाय सांगतो, जो आई-वडिलांना माहीत नसतो. म्हणजेच मुलाच्या संगोपनात ‘घर नामक कंपनी’चा प्रत्येक कर्मचारी सहभागी व्हावा लागतो. कुणाचंही महत्त्व नाकारून चालत नाही. संसारातलं हे सोपं तत्व जपान्यांनी औद्योगिक संशोधन क्षेत्रात वापरलं.त्यामुळे अत्यंत कमी वेळात त्यांनी उद्योग क्षेत्रांतील पारंपरिक 'दादा' असणाऱ्या युरोप अमेरिकेच्या नाकी दम आणला. चीननेही त्याचच अनुकरण केलं आहे.
 कंंपन्यांकडे उपलब्ध असणाऱ्या मनुष्यबळाचा विकास या दृष्टीने करण्याची नवी प्रथा २१ व्या शतकात सुरू झाली आहे. भारतात माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी या प्रथेचा अंगीकार करून अल्पावधीतच यशाचं शिखर गाठलं आहे. काही दिवसांपूर्वी मी एका सॉफ्टवेअर कंपनीत कार्यक्रमासाठी गेलो होतो. कर्मचारी प्रशिक्षणाचा वर्ग होता. सर्व कर्मचारी शालेेय विद्यार्थ्यांसारखे बाकावर चिडीचूप बसले असतील, अशी माझी अपेक्षा होती. पण मी खोलीत प्रवेश केला आणि भांबावून गेलो. माझे 'विद्यार्थी' गोल टेबलाभोवती बसून कोकाकोला, खाण्याचे पदार्थ यांचा आस्वाद घेत होते. हा वर्ग आहे की, पार्टी असा मला प्रश्न पडला. काही जण तर पदार्थ बाहेरही घेऊन जात होते.
 मी रिसेप्शनिस्टला विचारलं, ‘आपले काही कर्मचारी काही वस्तू बाहेर घेऊन जात आहेत याची नोंद तरी आपण ठेवता का?’ त्यांनी सांगितले, ‘छे, आम्ही हजेरीसुध्दा मांडत नाही.’ मग आपण संस्थेत शिस्त कशी सांभाळता? यावर त्यांनी सांगितलं,शिस्तीच्या आमच्या कल्पना वेगळ्या आहेत. आमची कंपनी २४ तास उघडी असते. प्रत्येक कर्मचाऱ्याने केव्हाही यावं, जावं! प्रत्येकाला त्याची जबाबदारी कळते. आम्ही केवळ आमचंं काम अपेक्षेप्रमाणे होते की नाही एवढेच पाहतो. ते कसं पूर्ण करायचं याचा निर्णय घेण्याचंं स्वातंत्र्य कर्मचाऱ्यांंना आहे.

 नवी व्यवस्थापकीय शैली म्हणतात ती हीच!

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/६१