पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/६३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कोंडाळंं लागते. आपली सुख-दुःखं इतरांनी वाटून घ्यावीत, ही त्याची इच्छा असते.ही संधी त्याला संस्था मिळवून देते.
 आपल्या सान्निध्यात येणारा प्रत्येक जण आपल्याला काही दुःख तर काही आनंद देतो. संस्था ही सुध्दा आपल्या जीवनात आलेली व्यक्तीच आहे. सुरक्षितता, पगार, विकासाच्या संधी व सामाजिक जीवन या संस्थेपासून मिळणाऱ्या चार गोष्टींची गोळाबेरीज आपल्याला त्रासापेक्षा अधिक आनंद मिळवून देत असेल तर केवळ पगाराकडेच लक्ष न देता आपण संस्थेशी एकरूप होऊन राहतो.

 याची प्रत्येक कर्मचाऱ्याला परिणामकारकपणे जाणीव करून देणं हे मनुष्यबळ व्यवस्थापनासमोरील आव्हान आहे. आपण संस्थेला जितकं देतो, त्यापेक्षा अधिक लाभ आपण संस्थेकडून उपटला तर आपण हुशार अशी कित्येक कर्मचाऱ्यांची समजूत असते. पण, दीर्घकालीन हिताचा विचार करता ही ‘हुशारी’ घातक ठरते, हे सत्यही कर्मचाऱ्याच्या वेळीच लक्षात आणून देणं हे मनुष्यबळ व्यवस्थापनाचे कार्य आहे. हे व्यवस्थापन ज्या संस्थांमध्ये चांगल्या प्रकारचं आहे, अशा संस्था कमालीच्या यशस्वी होतात असा माझा अनुभव आहे.

व्यवस्थापनासमोरील आव्हान/५४