पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/५९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जाणीव झाली पाहिजे. आपल्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे, आणि ती पार पाडली नाही तर कंपनीचं नुकसान होणार आहे, ही भावना असेल तर कर्मचारी जास्त उत्साहाने काम करतील. अंतिमतः याचा संस्थेलाच फायदा होईल. अहंकार किंवा स्वत्वाची जाणीव हा अध्यात्मात विकार मानला जातो. मात्र व्यवस्थापनात तोच गुण ठरतो. कर्मचाऱ्याचा अहंकार संस्थेच्या हिताकरता उपयोगात आणणं ही तर कुशल व्यवस्थापनाची कसोटीच असते. एखाद्या कर्मचाऱ्याकडून कामगिरी करून घ्यायची असेल, तर चतुर व्यवस्थापक त्याला एकट्याला बोलावून सांगेल, 'बघ हे काम मला तुझ्याचकडून करून हवंय, तूच ते सर्वात चांगलं करू शकशील.या महत्व देण्याच्या तंत्रामुळे कर्मचाऱ्याचा अहंकार जागृत होतो. तो जास्त जोमाने कामाला लागतो.
 मला एकाने विचारले होते, ‘कारखाना आजारी आहे हे आपण कसे ओळखता?'
 मी म्हणालो, ‘मी कारखान्यात जातो. तेथील पाईप गळत आहेत, पिंपे फुटलेली आहेत, सिमेंटसारख्या वस्तू उघड्यावर पडून वाया जात आहेत असं दृश्य दिसलं कि मी ओळखतो की येथे कुणालाच काळजी नाही. हा कारखाना आजारी आहे. माझा अंदाज सहसा चुकत नाही’ कारखानाही लहान मुलासारखाच असतो. त्याच्याकडे आपलेपणाच्या भावनेने लक्ष दिलं नाही तर तो ‘आजारी’ पडणारच.
प्रगतीची जाणीव :
 मी इथं काम करतोय. माझी प्रगती होतेय. रोज मला काही तरी नवं शिकायला मिळतंय, ही भावनासुध्दा माणसाला कार्यप्रवण बनवते. विशेषत: तरुण कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असं हमखास घडतं. आजचा तरुण अत्यंत महत्त्वाकांक्षी आहे. लवकरात लवकर आपण उच्चपदावर पोचले पाहिजे. या कंपनीत तशी संधी मिळत नसेल तर दुसच्या कंपनीत चान्स घेऊ, वाटेल तितके कष्ट करायला आपली तयारी आहे, अशा विचाराने तो झपाटलेला असतो आणि याच भावनेला व्यवस्थित खतपाणी मिळेल अशी व्यवस्था व्यवस्थापकाने केली, तर या वृत्तीचा संस्थेला फायदा होतो.

 तसं पाहता हे सर्व गुण व्यवस्थापकामध्ये असतातच, पण सध्याच्या स्पर्धात्मक काळात त्यांचा अधिकाधिक विकास करणं आवश्यक आहे. त्यातच भारताचे उज्ज्वल औद्योगिक भवितव्य दडलेलं आहे.

उज्ज्वल भवितव्याची त्रिसूत्री/५०