पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/५८

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


 सीमेवर अहोरात्र पहारा देणाऱ्या सैन्यातील जवानाचं उदाहरण पाहा. त्यांचा पगार ठराविक असतो, पण कामाचे तास निश्चित नसतात. शिवाय सतत जिवाला धोका असतोच. तरीही तो निर्धाराने उभा असतो. कारण त्याच्याबरोबर सर्वच जवान त्याच स्थितीत असतात. त्यांच्या रोज एकत्र कवायती चालतात. एकत्र जेवण होतं. पोशाखातून अंथरून पांघरूणापर्यंत सर्वात समानता असते. ही समानता हळूहळू वृत्तीत झिरपते. त्यानंतर ते एकमेकांशी व त्यांच्या 'मिशनशी’ समरस होतात. हीच समरसता त्यांच्या कार्यतत्परतेचं प्रेरणास्थान बनतं. अन्यथा गवताचं पातंही उगवू शकत नाही, अशा दुर्गम प्रदेशांत माणसाने वर्षानुवर्षे काढणं शक्य होणार नाही.
 आपलं काम, संस्था व सहकारी यांच्याशी कर्मचाऱ्यांना एकरूप करण्यासाठी जपानी कंपन्यांनी या युक्तीचा प्रभावी वापर केला आहे. कंपनीच्या अध्यक्षांपासून ते चतुर्थ वर्ग कर्मचाऱ्यांपर्यंत सर्व गणवेश वापरतात. त्यामुळे ‘दृश्य समानता’ निर्माण होते. कामाची सुरुवात समूहगानाने होते. वरिष्ठांपासून कनिष्ठांपर्यंत कुणीही हा रोजचा कार्यक्रम चुकवत नाही. (आपल्याकडे रोज सोडाच, पण १५ ऑगस्ट व २६ जानेवारी या राष्ट्रीय महत्त्वाच्या दिवशी ध्वजवंदनासही सक्ती नसल्यास कर्मचाऱ्यांची उपस्थिती अत्यल्प असते.) अशा साध्या भासणाऱ्या उपायांमधूनच जपानने विश्वव्यापी उद्योग निर्माण केले आहेत.
 भारतीय माणसाचा पिंड थोडा वेगळा आहे. सार्वजनिक ठिकाणी किंवा घरात प्रार्थना चालली असेल तर त्यात आपण आपला आवाज खुल्या मनाने मिसळतो, पण राष्ट्रगीत म्हणावयास लाजतो. कारण देव जितका ‘आपला' वाटतो, तितका देश वाटत नाही. सध्याच्या तीव्र स्पर्धेच्या युगात समरसता या प्रेरणास्त्रोताची जपणूक व विकास घडविण्यासाठी व्यवस्थापनास अधिक अधिक प्रयत्न करावे लागणार आहेत.
'महत्त्वा' ची जाणीव :
 बऱ्याच वर्षांपूर्वी मला काठमांडूहून निमंत्रण आलं होतं. येताना पत्नीसही घेऊन यावं असं सुचविण्यात आलं. मी पत्नीस विचारलं तेव्हा ‘मी तुमच्याबरोबर आले तर घराकडे कोण पाहणार' असे विचारून तिनं येण्याचं नाकारलं. शेवटी ‘ते काही नाही, तुला बाबांबरोबर जावंच लागेल', असं प्रत्यक्ष मुलांनीच सुनावल्यानंतर ती कशीबशी तयार झाली, पण काठमांडूमधील आमच्या चार दिवसांच्या मुक्कामात तिच्या डोक्यात आणि तोंडात घराचाच विषय होता. घरात आपण महत्त्वाचे आहोत. आपल्याशिवाय घर चालणार नाही या भावनेपोटी हे घडत होतं.

 औद्योगिक संस्थेतही प्रत्येक कर्मचाऱ्याला आपण येथे महत्त्वाचे आहोत, याची

अद्भूत दुनिया व्यवस्थापनाची/४९