पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/२८०

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


उरले तर तिचा चेहरा प्रफुल्लित झालेला दिसतो.व्यवस्थापन शास्त्राची कुठलीही पदवी न घेताही ती एक कुशल व्यवस्थापक असते.
 एखाद्या प्रचंड कारखान्यातील महिना एक लाख रुपये पगार मिळविणारा जबाबदार आणि कर्तव्यपरायण व्यवस्थापक तरी यापेक्षा वेगळे काय करतो? फक्त तो उच्च पदावर असतो,म्हणून मोठा वाटतो इतकंच.सांगायचा मुद्दा असा की,आपलं कार्यक्षेत्र मोठं असो वा लहान, व्यवस्थापनाच्या या तत्त्वांचं चिंतन,मनन आणि अंगीकार केला पाहिजे.व्यवस्थापनावर कोणत्याही विशिष्ट गटाची मालकी नाही.ते सर्वसमावेशक आणि सर्वव्यापी आहे. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रातील कोणत्याही पदावरील व्यक्तीनं आपण केवळ कर्मचारी नव्हे तर व्यवस्थापक’ आहोत या भावनेनं काम केल्यास ते अधिक सरस होतं. व्यवस्थापनशास्त्राच्या पैलूचा आपण या लेखमालेतून मागोवा घेतला आहे.व्यवस्थापनाची मूलभूत तत्त्वं आपापल्या परीनं सर्वच जण अमलात आणत असतात.तथापि,यालाच 'व्यवस्थापन' म्हणतात, याची जाणीव त्यांना नसते म्हणजेच, त्यांना ही कला लहान-मोठ्या प्रमाणात अवगत असते, पण त्याचं शास्त्र माहीत नसतं.ते समजून घेण्याचा अल्पसा प्रयत्न आपण केला आहे.या विषयाचा विस्तार प्रचंड आहे.साहजिकच त्याचे सर्व बारकावे आणि खुब्या यांचा परामर्श घेणं शक्य झालं नसलं तरी या विषयाच्या रुपरेषेशी आपण परिचित झालो आहोत.
 अन्य पशूंंपासून आपण वेगळे आहोत याची जाणीव माणसाला झाल्यापासून गेल्या १० हजार वर्षात मानवाने कृषी ते संगणकयुग अशी चौफेर प्रगती केली.विशेषतः औद्योगिक क्रांतीची सुरुवात २०० वर्षांपूर्वी झाल्यानंतर तर या विकासाचा वेेग अधिकच वाढला.या प्रगतीत व्यवस्थापन शास्त्राचा सिंहाचा वाटा आहे.
 या कालावधीत मानवजातीनं विकासाचे अनेक टप्पे पार केले.प्रत्येक टप्प्यावर तिनं अनेक नव्या संकल्पना स्वीकारल्या व जन्यांना मूठमाती दिली.‘व्यवस्थापन’ या सर्व टप्प्यांचा साक्षीदार आहे. या प्रवासाचा मागोवाही या लेखमालेतून घेण्यात आला.
 वैदिक वाङ्मयात एक प्रार्थना आहे.

असतो मा सत् गमय । तमसो मा ज्योतिर्गमय ।।


मृत्योर्मा अमृतम् गमय । ओम शांतिः शांतिः शांतिः ।।


 अर्थात, असत्य लयाला जावो आणि सत्याचा उत्कर्ष होवो.अंधार नष्ट होवो आणि प्रकाशाचा उदय होवो.मृत्यूची जागा अमरत्व घेवो.या हजारो वर्षांपूर्वीच्या प्रार्थनेत व्यक्त करण्यात आलेल्या आशावादाच्या दिशेनेच आपली वाटचाल सुरू आहे.व्यवस्थापनशास्त्राचे मूळ उद्दिष्ट हेच तर आहे.

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/२७२