पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/२६८

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


पडण्याची तयारीही त्यानं ठेवली पाहिजे.
४) शरणागती :
 वरील तीनही मार्ग अयशस्वी ठरल्यास ‘सर सलामत तो पगडी पचास’ हे धोरण व्यवस्थापकाला अवलंबावं लागतं. प्रत्येक वेळी नवं काम किंवा नोकरी मिळणं शक्य नसतं. अशा वेळी 'यशस्वी माघार' घेऊन स्वतःचा मान आणि अस्तित्व टिकवून धरणं ही ‘स्टॅटेजी' वापरावी लागते. लढाईत प्रत्येक वेळी विजयच होईलच अशी अपेक्षा बाळगणं व्यर्थ आहे. काही वेळा पांढरं निशाण फडकावून स्वतःला तयारीसाठी वेळ देणं आणि पुन्हा संधी मिळताच पूर्ण तयारीनिशी हल्लाबोल करणं यात लाजण्यासारखं काहीच नाही. युक्तीनं पत्करलेल्या शरणागतीचाही तणाव कमी होण्यास उपयोग होतो. तणाव कमी करण्यासाठी काय करावं हे आपण पाहिलं. आता काय करू नये हे देखील ध्यानात घेतलं पाहिजे.
 स्वतःवरचा ताण घालविण्यासाठी दुसऱ्यावर टीका करणं, अपशब्दांचा वापर करणं, शिव्याशाप देणं हा उपाय खूपच लोकप्रिय आहे. मात्र, शहाण्या व्यवस्थापकानं तो कधीही करू नये. कारण त्यामुळं तणाव तात्पुरता वाढविण्यासच तो उपाय कारणीभूत ठरतो. दुसऱ्यांबद्दल वाईट बोलणाऱ्यांची पत आणि इभ्रत राहत नाही हे सूज्ञ व्यवस्थापकानंं लक्षात घ्यावं.
व्यक्तिगत अडचणी :
 यामुळं निर्माण होणाऱ्या तणावांवरही वरील उपाय लागू पडतात. घरगुती समस्यांचा कार्यालयीन कामावर परिणाम होऊ नये याची खबरदारी प्रत्येकानं घेतली पाहिजे. व्यक्तिगत तणाव आपल्या जिवलग मित्रांबरोबर किंवा नातेवाईकांबरोबर हितगुज करून दूर करता येतात.
सारांशः

 मानसिक तणाव हा व्यवस्थापकीय कामाचा अविभाज्य आणि अटळ हिस्सा आहे. त्याचप्रमाणं अति तणाव शारीरिक अस्वास्थ्याला कारणीभूत ठरतो. हेही सत्य आहे. तेव्हा तणावाची अपरिहार्यता आणि त्याचा विपरीत परिणाम या दोन टोकांच्या मध्यभागी स्वतःला ठेवणं, ही कला प्रत्येक व्यवस्थापकाला आत्मसात करून घ्यावीच लागते. तणाव कमी करण्याचा हाच एक राजमार्ग आहे.

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/२६०