पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/२६४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

व्यवस्थापन ‘तणावा'चं


णाव' हा व्यवस्थापकीय कामकाजाचा एक अविभाज्य घटक आहे.त्यामुळं त्याच्याशी जुळवून घेणं प्रत्येक व्यवस्थापकासाठी अनिवार्य आहे.जेव्हा तणाव एका मर्यादेच्या आत असतो, तेव्हा त्याची समस्या तितकीशी जाणवत नाही.इतकंच नव्हे तर मर्यादित तणाव हा दोन तऱ्हांनी उपयुक्त असतो. एक,त्यामुळं व्यवस्थापक कृतिशील राहतो. तणावच नसेल, तर आळस येतो. काम टाळण्याची प्रवृत्ती निर्माण होते.उदाहरणार्थ, या रविवारी आपल्या वडिलांना पत्र लिहायचं असा निश्चय आपण करतो. रविवारी सुटी असल्यानं आपल्यावर तणाव नसतो. पूर्ण दिवस पडलाय,लिहू आरामात अशा विचारात सकाळी उशिरा उठणं होतं, मग वर्तमानपत्राचं वाचन आणि नाश्ता होईपर्यंत आवडत्या टी.व्ही.शो ची वेळ झालेली असते. मग जेवण. त्यानंतर आठवड्यातून एकदाच करायला मिळणारी वामकुक्षी.तुम्ही जागे होता तेव्हा टीव्हीवरच्या संध्याकाळच्या सिनेमाची वेळ झालेली असते. तो संपेपर्यंत रात्रीच्या भोजनाची वेळ. भोजनानंतर'आता पुढच्या रविवारी लिहू पत्र,'असा विचार करून तुम्ही निद्रादेवीच्या अधीन होता. असं होता होता महिनोंमहिने पत्र लिहायचं राहून जातं. एक दिवशी वडिलांचंच तुम्हाला पत्र येतं. त्यांनी त्यांची काही अडचण कळविलेली असते. वडील अडचणीत आहेत असं समजता तमच्यावरील तणाव वाढतो.त्या तिरमिरीत तुम्ही पत्र लिहायला बसता, आणि जे काम कित्येक रविवार झालेलं नसतं,ते एका तासात पूर्ण होतं हा महिमा ‘तणावा'चा असतो. मात्र, विशिष्ट मर्यादिपलीकडं तणाव वाढल्यास त्याचा उलट परिणाम होतो.तणाव वाढत असताना एका ठराविक मर्यादेपर्यंत आपली कामगिरी चांगली होते. तो खूपच वाढला म्हणजे काम नकोसं होतं.कामाचा आनंद मिळण्याऐवजी कामाबाबत भीती निर्माण होते. याच ठिकाणी तणावांंचं व्यवस्थित व्यवस्थापन करण्याची आवश्यकता असते.
 विशिष्ट पातळीपर्यंतच्या तणावाची शरीराला सवय झाली की,त्यापेक्षा कमी किंंवा अधिक तणावाचा त्रास होऊ लागतो. माझ्या शेजारी एक वृध्द दाम्पत्य राहतं.त्यातील महिलेनं आपल्या मुलांना सर्व प्रकारच्या खस्ता खाऊन वाढवलं, शिकवलं,मोठं केलं. त्या २०-२५ वर्षात प्रचंड काम पडूनही तिला कामाचा तणाव अजिबात

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची /२५६