पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/२६२

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


तणाव म्हणजे काय?
 काम आणि जबाबदारी या धक्क्यांविरुध्द शरीराने व्यक्त केलेली प्रतिक्रिया म्हणजे तणाव असं म्हणता येईल.कामाचं ओझं जितकं जास्त तितकी ही प्रतिक्रिया अधिक तीव्र असते. मात्र, ही सर्व व्यक्तींमध्ये सारख्या प्रमाणात निर्माण होत नाही. समान कामाचा दोन भिन्न व्यक्तींच्या शरीरावर होणारा परिणाम वेगवेगळा असतो.
 गेल्या दहा हजार वर्षांचा इतिहास पाहता असं दिसतं की, मानवाच्या कामांमध्ये ज्या झपाट्याने फरक पडत गेला, त्या वेगानं त्याच्या शरीराची रचना व क्षमता बदलत गेलेली नाही. म्हणजेच आपलं आजचं शरीर हे आजच्या कामांच्या तुलनेत कालबाह्य आहे.शरीर दोन हजार वर्षांपूर्वीच पण कामं मात्र आजची,अशी स्थिती आहे. वाहतुकीच्या रस्त्याच्या उदाहरणावरून हा मुद्दा चांगल्या प्रकारे समजून घेता येईल.
 रस्त्यावरील वाहतूक सुरळीत चालेल की नाही, हे वाहनांची संख्या आणि रस्त्यांची रुंदी व मजबूतपणा यावर अवलंबून आहे. दरवर्षी वाहनांची संख्या वाढत जाते, पण रस्त्यांची रुंदी वाढविता येत नाही. ती-कधी तरी २५-३० वर्षांनी एकदाच वाढविली जाते. साहजिकच वाहनांच्या वाढत्या संख्येचा ताण रस्त्यावर पडतो. मग, ट्रॅफिक जाम, अपघात, प्रदूषण इत्यादी समस्या रोजच्याच होऊन बसतात.वाहनं आणि रस्ता यांचा जो संबंध आहे,तोच शरीर आणि त्याला करावी लागणारं कामं यांचा आहे.
 कामाचा ताण वाढला की, सर्वात आधी समस्या जाणवू लागते ती रक्तदाबाची. असं का होतं याचंही मजेशीर कारण आहे. हजारो वर्षांपूर्वी मानव आजच्यासारखा शहरात नव्हे तर जंगलात राहत होता. एखादा हिंस्त्र प्राणी समोर आला की, त्याच्यासमोर दोनच पर्याय असत. एक लढणे किंवा पळणे.दोन्ही कामांसाठी शरीरातील रक्ताभिसरणाचा वेग वाढण्याची आवश्यकता असे. त्यामुळे मेंदूकडून रक्तात अधिक प्रमाणात अँड्रिनेलिन हे द्रव्य मिसळले जाई. त्यामुळे रक्तदाब वाढत असे व लढणे किंवा पाळणे शक्य होई. म्हणजेच रक्तदाबाचा फायदा होत असे.धोका टळला की रक्तदाब नाहीसा होऊन शरीर मूळपदावर येत असे.
 शरीराची ही सवय आजही टिकून आहे. काम समोर आलं की रक्तदाब वाढतो. पण आधुनिक जगातील कामाचं स्वरूप वेगळं आहे.आपण कामाशी 'लढू'ही शकत नाही. किंवा त्यापासून पळून `जाऊ' शकत नाही. एक उदाहरण पाहू या.समजा, आपली कामं सुरू होण्याची वेळ सकाळी ९ वाजता आहे, पण आपण १० वाजता कामावर गेलो. आपला बॉस त्या अगोदर तिथं आलेला आहे. आपण जागेवर नसल्याचं पाहून त्याने ‘ताबडतोब येऊन भेटावे' असा निरोप ठेवला आहे.

 तो निरोप जेव्हा आपल्याला कळतो, तेव्हा आपला रक्तदाब वाढतो, पण आपण बॉसशी भांडू शकत नाही, कारण चूक आपली असते व बॉसला भेटणं टाळू शकत

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/२५४