पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/२५९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कुटुंब नियंत्रित उद्योगांंचंं भवितव्य

द्योग किंवा व्यापार हे जसं शास्त्र आहे तशी ती एक कलाही आहे.ती प्रत्येकाला साध्य असेल किंवा होईल असं नाही. हे कौशल्य परंपरेने बापाकडून मुलाकडे, मुलाकडून त्याच्या मुलाकडे जातं असंही खात्रीपूर्वक म्हणता येत नाही. तथापि, आपण निर्माण केलेलं औद्योगिक साम्राज्य (मग ते छोटं असो की मोठं) आपल्या पश्चात आपल्या मुलानं चालवावं, त्यात भर घालून ते यथाशक्ती मोठ करावं. त्याचं नियंत्रण आपल्या कुटुंबाबाहेर जाऊ नये अशी प्रत्येकाची इच्छा असतेे. या भावनेपोटीच कुटुंब नियंत्रित उद्योगाचा जन्म होतो.
 एखादी कर्तबगार व्यक्ती अंतःप्रेरणा व स्वतःचं अंगभूत कौशल्य यांच्या जोरावर एखाद्या उद्योगाची सरुवात करते. स्वत:च्या अपत्याप्रमाणे त्याचं पालनपोषण आणि विकास करते. त्या व्यक्तीनंतर आपोआपच अशा उद्योगाची मालकी त्या व्यक्तीच्या पुढच्या पिढीकडं जाते.
 खासगी उद्योगांमध्ये यशस्वीतेचे प्रमाण बरंच कमी आहे. जर १०० उद्योग सुरू करण्यात आले तर त्यातील ९० पहिल्या तीन वर्षांत बंद पडतात. उरलेल्या १० पैकी ९ रखडत कसेबसे चालविले जातात. तर फक्त एक यशस्वी होतो व योग्य पध्दतीनं विकास पावतो.
 असा यशस्वी उद्योग स्थापन करणारी व्यक्ती ही तशीच तयारीची व सक्षम असते. ही सक्षमता निसर्गाची देणगी असून ती एखाद्या व्यक्तीलाच लाभलेली असते. तिच्या पुढच्या पिढीत ती त्याच प्रमाणात उतरेल अशी खात्री देता येत नाही. तरीही वारसाहक्कानेे अशा उद्योगांची मालकी तिच्या पुढच्या पिढ्यांना मिळत जाते.

 कुटुंब नियंत्रित उद्योगांना इतिहासकाळी जातीय परिमाणही लाभले होते. इंग्रजांनी आधुनिक उद्योग भारतात आणण्यापूर्वी भारतात उद्योगांना जातिव्यवस्थेचा आधार मिळत असे. म्हणजेच एखादा विवक्षित उद्योग ठराविक जातीनं करायचा असा प्रघात होता. अन्य जातींना तो करण्यास बंदी होती. साहजिकच या जात्याधारित उद्योगांना सुरक्षित

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची /२५०