पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/२५७

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


भारतातील शाखेवरही होत असतो. बहुराष्ट्रीय कंपन्या संस्था चालकांच्या किंवा मालकांच्या लहरीपेक्षा संस्थेच्या हिताला व संस्थेच्या उद्दिष्टांना अधिक प्राधान्य देतात. त्यामुळे कर्मचाऱ्याची प्रत्येक कृती व चूक याकडे बारकाईनं लक्ष ठेवलं जातं. तिची नोंद घेतली जाते. त्यावर चर्चा होते. ‘व्यक्ती’ महत्त्वाची न मानता कामगिरी महत्त्वाची मानली जाते. साहजिकच अशा कंपन्यांचा ग्राहकांवर विशेष प्रभाव पडतो.
 बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या या रेट्यामुळं भारतीय कंपन्यांनाही आपल्या नीतिमूल्यांमध्ये बदल करावे लागत आहे. परिणामी त्यांच्या आचारसंहितेला गेल्या काही वर्षांत निराळं वळण लागलं आहे. हे बदल केल्याशिवाय व आधुनिक श्रमसंस्कृतीचा स्वीकार केल्याशिवाय आपण तग धरू शकणार नाही, ही जाणीव देशी कंपन्यांनाही प्रकर्षानं होत आहे.
बाजार अर्थव्यवस्थेचा परिणाम :
 असं म्हटलं जातं की, कोणत्याही औषधाचे सुपरिणाम असतात तसे दुष्परिणामही असात. ज्या औषधाचे दुष्परिणाम नसतात, त्याचे सुपरिणामही होत नाहीत. सर्व प्रकारच्या अर्थव्यवस्थेबाबतही हे खरे आहे. सध्या जगात सर्वत्र आर्थिक सुधारणांचे वारं वाहत आहे. त्यामुळे ग्राहकांची बाजारपेठ, बाजाराधित अर्थव्यवस्था इत्यादी संकल्पना स्वीकारल्या जात आहेत. त्याचा परिणाम उद्योगांच्या नीतिमूल्यांवर होणं साहजिकच आहे.
 या संकल्पनांचा सुपरिणाम म्हणजे उद्योगक्षेत्र अधिक स्पर्धात्मक झाले. उत्पादनांचा दर्जा सुधारला. निर्बंधांच्या भिंती ढासळल्यामुळे आयातनिर्यात सुलभ झाली. नव्या तंत्रज्ञानाच्या विकासाला अधिक चालना मिळाली. ग्राहक अधिक चोखंदळ व जागरूक बनले.
 तथापि, त्याचबरोबर नोकरीतील अस्थिरता वाढण्याचा दुष्परिणामही होऊ लागला. 'लाईफ लाँग’ नोकरी ही संकल्पना मागे पडली. याचाही परिणाम उद्योगांच्या नीतिमूल्यांवर झाला आहे.

 याखेरीज अनेक प्रकल्पांना होणारा पर्यावरणवाद्यांचा विरोध हा देखील गेल्या काही दशकांत समोर आलेला बदल आहे. पन्नास पंचाहत्तर वर्षांपूर्वी विकास या एकाच ध्येयाने समाज झपाटलेला असल्याने पर्यावरणाचा फारसा विचार न करता जोमाने महाप्रकल्प उभे राहिले. मोठमोठी धरणं, वीजनिर्मिती केंद्रं, रस्तेबांधणी, नागरी वस्त्यांची वाढ यामुळं होणाऱ्या निसर्गाच्या हानीची कल्पना त्यावेळी आली नाही, पण ही हानी अंतिमत: माणसाच्याच मुळावर उठणार आहे याची जाणीव झाल्यानंतर निसर्गप्रेमी आणि पर्यावरणवाद्यांनीही आपल्या संघटना बळकट करून दबावगट तयार केले.

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची /२४८