पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/२५२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असतं. प्रत्येक संस्थेत अतिमहत्त्वाची व सत्तालोलुप अशी मंडळी असतात ती एकत्र येऊन स्वतःच्या समान स्वार्थासाठी एक दबाव गट तयार करतात. संस्थेतील उच्चपदस्थांमध्ये स्वतःचंच वर्चस्व टिकविणं आणि वाढविणे यासाठी उघड किंवा छुपी स्पर्धा सुरू असते.असे उच्चपदस्थ या गटांना हाताशी धरतात. मग विरुध्द गटाचे पाय ओढण्यासाठी राजकारण सुरू होतं. कालांतराने विविध गटांमधील ही स्पर्धा संस्थेच्या हितांचा बळी देऊन चालविली जाते. या प्रक्रियेला गटबाजी असं म्हणतात.अधिकाधिक अधिकार आपल्या हातात आले पाहिजेत ही एकच भावना गटबाजीची प्रेरणा असते. सत्ताधीशाच्या गटात शिरकाव झाला की, आपल्यालाही सत्तास्थान मिळू शकेल या आशेपोटी गटबाजी वाढते. राजकारण हे त्याचं इवलंसं उदाहरण आहे.
 चमचेगिरी जशी पूर्णपणं नाहीशी करता येत नाही, तेच गटबाजीबाबतही सत्य आहे. मात्र, चमचेगिरीलाही एक सकारात्मक बाजू असते. तशी गटबाजीलाही आहे. एकमेकांना पाण्यात पाहणाच्या गटांचं जर संस्थेला प्रगतिपथावर नेणाच्या संघांमध्ये म्हणजेच टीम्समध्ये रूपांतर करता आले तर गटबाजीचाही फायदा संस्थेला होऊ शकतो. एकमेकांचे पाय ओढण्यापेक्षा स्वतःच्या विभागांची उन्नती साध्य केली तर सत्तास्थानंही मिळतील आणि संस्थेचंही कल्याण होईल, ही भावना गटबाजी करणाच्यांमध्ये रुजवली तर गटांच टीममध्ये रूपांतर करता येणे शक्य असतं. मनुष्यबळ व्यवस्थापकाने हे कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे.
 अमेरिकेत सध्या व्यवस्थापनाचा एक अभिनव प्रकार रूढ होत आहे. त्याला ‘मॅनेजमेंट बाय वाँडरिंग अराऊंड’ असं म्हणतात. त्या अंतर्गत उच्चपदस्थ अधिकारी किंवा व्यवस्थापक आपला काही वेळ संस्थेस कोणत्याही पूर्वनियोजित कार्यक्रमाशिवाय फेटफटका मारण्यासाठी देतात. त्यामुळे त्यांना नेहमी न भेटणाच्या अनेक लोकांशी बोलण्याची, त्यांना समजून घेण्याची संधी मिळते. शिवाय यामुळं चमचेगिरी आणि गटबाजीलाही काही प्रमाणात आळा बसतो. भारतीय व्यवस्थापकांनीही हा मार्ग अवलंबिला पाहिजे.
सारांंश:

 मनुष्बळ व्यवस्थापनाची कला कोणतेही व्यवस्थापकीय कामकाज करताना उपयोगी पडणारी कला आहे. यंत्र आणि साधनं यांचा उपयोगही अंतिमतः मानवाच्याच हातून होत असल्याने ही कला व्यवस्थापन क्षेत्रात सर्वश्रेष्ठ आहे. इतर कोणत्याही कलेप्रमाणं ही देखील उपजत असावी लागते हे खरं असलं तरी प्रयत्नानं ती विकसित करता येते.

मानवबळ व्यवस्थापन आणि सत्ता /२४३