पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/२४८

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


असतील, तर कर्मचाऱ्यांकडून त्यापेक्षा अधिक अपेक्षा बाळगता येणार नाहीत. समरसता म्हणजे काय हे व्यवस्थापकांनी स्वतःच्या उदाहरणांनी सिध्द केलं पाहिजे.
जबाबदारीची जाणीव :
 कर्मचाऱ्याची श्रेणी कोणतीही असली तरी आपण संस्थेतील जबाबदार व महत्त्वाची व्यक्त आहोत अशी त्याची भावना असावयास हवी. आपण 'खालच्या जागेवरील’ नोकर आहोत. त्यामुळं आपल्याला फारशी काळजी करण्याचं कारण नाही. ‘वरचे लोक' काय ते बघून घेतील. आपण बिनधास्त राहू असं कर्मचाऱ्याला वाटल्यास अनेक कामं अडून बसतील. उदाहरणार्थ, फायलींची ने-आण करण्याची जबाबदारी शिपायाची असते. त्यानं ती वेळेवर पार पाडली नाही, तर महत्त्वाच्या निर्णयांनाही विलंब लागून संस्थेचे नुकसान होऊ शकतं. म्हणूनच आपलं स्थान कोणतं आहे, याचा विचार न करता आपलं काम त्वरित आणि नेटक्या पध्दतीनं केलं पाहिजे, ही भावना कर्मचाऱ्यांच्या मनात निर्माण होईल हे व्यवस्थापनाने पाहिलं पाहिजे.
विकासाची आस :
 संस्थेमुळं माझं ज्ञान आणि अनुभवविश्व समृध्द होत आहे. माझा विकास होत आहे. इथं मला रोज काही तरी नवं शिकायला मिळत आहे, ही भावना कर्मचाऱ्यांसाठी, विशेषत: तरुण कर्मचाऱ्यांसाठी फार मोठी प्रेरणाशक्ती असते. नव्या पिढीतील तरुण अधिक महत्त्वाकांक्षी आहेत. त्यांना उच्चपदांवर पोहचण्याची जबरदस्त इच्छा असते. एका संस्थेत ही संधी मिळत नसेल तर ते नोकरी बदलण्यास मागेपुढे पाहणार नाहीत. त्यामुळं, आपली प्रगती होत आहे, असं त्यांना जोपर्यंत वाटतं तोपर्यंत ते अधिकाधिक कार्य करण्याला प्रवृत्त होत राहतील. मात्र, आपला विकास खुंटतोय, असं जाणवू लागल्यास त्यांच्या उत्साहावर विरजण पडेल.
 साहजिकच तरुण कर्मचाऱ्यांचा उत्साह टिकून राहील, हे पाहण्याची जबाबदारी व्यवस्थापनाची आहे. तरुण कर्मचारी त्याचं करिअर सुरू करतो, तेव्हा त्याला दोन प्रकारचे बॉस भेटतात. एक जण त्याला म्हणतो, ‘तू एक बुध्दिमान युवक दिसतोस. जा, तुझं काम निर्धास्तपणे कर. काही समस्या आली तर मला येऊन भेट.’ तरुणाचा उत्साह द्विगुणित होतो. मग तो आठ नव्हे, बारा तास काम करावयालाही मागे पुढे पाहात नाही.

 पण त्याला दुसऱ्या प्रकारचा बॉस भेटला तर तो सुनावतो, ‘तू हे काम पूर्वी केलं आहेस का? नसेल तर आता करू नकोस. चुका करून ठेवल्यास तर आम्हाला त्या निस्तराव्या लागतील. जे काम तू पूर्वीपासून करत आला आहेस तेच कर आणि प्रत्येक वेळी माझा सल्ला घेत जा.’ अशा प्रवृत्तीच्या वरिठांमुळं कर्मचाऱ्याचा विरस होतो. मग

मनुष्यबळ व्यवस्थापनाची तीन सूत्रे/२३९