पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/२४७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मनुष्यबळ व्यवस्थापनाची तीन सूत्रे


पण काम करतो ती संस्था ‘आपली’ आहे अशी उत्कट भावना निर्माण झाली की, आणखी कोणत्या प्रेरणेची आवश्यकताच उरत नाही. संस्था आपलं घर असून आपण त्यातील एक जबाबदार सदस्य आहोत हा विचार कर्मचाऱ्याच्या मनात जागा होताच तो आपलेपणानं त्याची जबाबदारी पार पाडतो. आपण नेहमी वेठबिगार मजुरांच्या समस्यांविषयी गप्पा मारतो. पण आपल्या घरातील गृहलक्ष्मीहून अधिक वेठबिगार कुणी असेल का? घरातील सर्वांना रविवारी सुटी असते, पण तिला त्या दिवशी जास्त काम असतं. बरं, तिचा जन्मही त्या घरात झालेला नसतो. दुसऱ्याच घरात जन्मलेल्या आणि वाढलेल्या तिला एके दिवशी सासरी आणण्यात येतं आणि सांगितलं जातं, आजपासून हे तुझं घर! आणि त्या दिवसापासून ती त्या घराशी समरस होते. मग घर नीटनेटकं राहिलं पाहिजे, कुणी अतिथी आल्यास त्याला समाधान वाटलं पाहिजे या दृष्टीनं तिचे प्रयत्न सुरू होतात. आपल्या अधिकाराचा वापर करून ती घरातील इतरांनाही या प्रयत्नात सामील करून घेते. पाहता पाहता सुखी संसार उभा राहतो.

 अर्थात नोकरीच्या ठिकाणी इतकी समरसता असू शकत नाही आणि तशी अपेक्षाही केली जाऊ शकत नाही. पण वरील उदाहरणातील तत्त्व लक्षात घेण्याजोगं आहे. एकदा समरसता निर्माण झाली की, फायद्या-तोट्याचा काटेकोर विचार न करता आपल्या संस्थेसाठी काम करण्याची प्रेरणा आपोआप मिळते.
 अशीच आत्मीयतेची भावना व्यवस्थापनाचीही कर्मचाऱ्यांबाबत असली पाहिजे. कारण हा व्यवहार एकतर्फी असू शकत नाही. गृहलक्ष्मी घरातील सर्व काम निमूटपणे करते याचा अर्थ इतरांचं घरासाठी काहीच कर्तव्य नाही असा नसतो. संस्थेबाबतही हेच सूत्र आहे.

 ही समरसतेची भावना निर्माण करणं वाटतं तितकं सोपं नाही. त्यासाठी व्यवस्थापकांनी स्वतःच्या मानसिकतेमध्ये बदल करणं आवश्यक आहे. व्यवस्थापक जर संस्थेचा उपयोग ‘पैसा मिळवून देणारं ठिकाण’ इतक्या मर्यादित व संकुचित पध्दतीनं करणार

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/२३८