पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/२४५

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


स्वतःमध्ये योग्य ते परिवर्तन घडविण्याची अचाट क्षमता मानवात आहे. या क्षमतेचं व्यवस्थित मूल्यमापन व व्यवस्थापन झाल्यास वरकरणी सामान्य भासणाच्या माणसाकडूनही मोठी कामं करून घेतली जाऊ शकतात. म्हणूनच मानव व्यवस्थापन ही एक कला आहे आणि कोणत्याही संस्थेचं यश, पैसा किंवा साधनसामग्री यापेक्षा मानव व्यवस्थापनावर अधिक अवलंबून आहे.
 माणूस, सामुग्री आणि यंत्रं ही कोणत्याही संस्थेत व्यवस्थापनाचे प्रमुख विषय असतात. यापैकी सामग्री आणि यंत्रे यांच्या व्यवस्थापनाला मर्यादा असतात. कारण त्यांची क्षमता अगोदरच निश्चित केलेली असते.त्यात बदल होण्यास फारसा वाव नसतो. त्यांचा वापर १०० टक्क्यांहून अधिक प्रमाणात करणं दुरापास्त असतं.केवळ मानवबळाचाच उपयोग १०० टक्क्यांहून अधिक प्रमाणात केला जाऊ शकतो.
 संस्थेने हाती घेतलेला प्रकल्प आकार घेत असतो, तेव्हा कर्मचारी वर्ग नेहमीच्या आठ तासांपेक्षाही अधिक काळ काम करतो. प्रकल्प पूर्णत्वास येत असताना १६ तास म्हणजे २०० टक्के क्षमतेनेही काम करावं लागतं. शेवटच्या काही दिवसांत तर ‘राऊंड द क्लॉक’ म्हणजे जवळपास ३०० टक्के क्षमता उपयोग आणावी लागते.
 मानवाच्या या क्षमतेला एक नकारात्मक बाजूही असते. जसा तो क्षमतेपेक्षा अधिक काम करू शकतो, तसा काम चुकविण्यातही त्याच्याइतका पटाईत प्राणी दुसरा सापडणार नाही. जास्तीत जास्त मोबदल्यात कमीत कमी काम पडावं अनेककमीत कमी पडावंं यासाठी अनेक युक्त्याप्रयुक्त्या तो करत असतो. शिवाय बैल किंवा तत्सम प्राण्यांप्रमाणं त्याच्या नाकात वेसण घालून राबविता येत नाही.
 या नकारात्मक गुणधर्माचा प्रभाव कमीत कमी असावा आणि त्याची क्षमता पूरेपूर उपयोगात आणण्यासाठी तो उद्युक्त व्हावा हे व्यवस्थापनासमोरील सर्वात मोठं आव्हान असतंं आणि ते युक्तीनं साध्य करावं लागतं. म्हणूनच मानव व्यवस्थापन ही शास्त्राबरोबरच एक कलाही आहे.
 ‘चला, ऑफिसची वेळ झाली. कामावर हजर राहून पाट्या टाकल्या पाहिजेत,'असे उद्गार सरकारी कर्मचारी नेहमी काढताना आपण ऐकतो. म्हणजे केवळ कामावर हजर राहणं आणि नेमून दिलेलं काम यांत्रिकपणे करणे एवढाच त्याचा उद्देश असतो.कामाबाबत आपलेपणाची भावना जवळपास नसतेच.

 त्यामुळे कर्मचाऱ्यांना कामावर लक्ष केंद्रित करावयास लावणं हे व्यवस्थापनासमोरचं आव्हान असतं. कर्मचाऱ्यांच्या कामगिरीच्या दोन पातळ्या असतात. एक, कमीत कमी काम करून सटकणं आणि दोन, आपली पूर्ण क्षमता उपयोगात आणणं. कर्मचाऱ्याचा प्रवास पहिल्या पातळीकडून दुसऱ्यापर्यंत होण्यासाठी व्यवस्थापनानं प्रेरक शक्ती म्हणून काम केलं पाहिजे. ही प्रेरणा किंवा मोटिव्हेशन हा मानव व्यवस्थापनातील

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/२३६