पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/२३८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

भावत नाही. विशेषत: हे उपाय व्यक्तिशः त्याला अडचणीचे ठरणार असतील किंवा संस्थेतील त्याच्या मर्जीतली माणसं, त्याचे नातेवाईक इत्यादींना ती गैरसोयीची वाटत असेल, तर ती त्याला पसंत पडत नाही. संस्थेची संरचना, कार्यपध्दती यात सुधारणा करण्यासाठी सुचविलेले उपाय तो मान्य करतो. पण स्वतः आणि स्वतःचे नातेवाईक यांच्या विरोधातील उपाय तो मान्य करत नाही. इथं सल्लागाराच्या प्रामाणिकतेची कसोटी लागते. संस्थेचं व्यापक हित लक्षात घेऊन उपाययोजना करण्यापेक्षा त्याने संस्थेतील सत्ताधारी व्यक्तींच्या फायद्याचा विचार केला, तर अशी कृती केवळ व्यावसायिक नीतिमत्तेच्या विरुध्द असते असे नव्हे, तर सल्लागाराच्या भवितव्याच्या दृष्टीनेही धोक्याची असते. कारण एकदा त्याची सत्यनिष्ठा कच्ची आहे अशी प्रतिमा निर्माण झाली की, त्याच्याकडे तसेच क्लायंट्स येऊ लागतात. कालांतराने त्याचे नाव खराब होतं.
 याचं तारतम्य सल्लागाराने बाळगलं पाहिजे. त्याने संस्थेचं दीर्घकालीन हित लक्षात घेऊन उपाययोजना सुचविली पाहिजे आणि तिच्याशी ठाम राहिलं पाहिजे. संस्थेची समस्या केवळ संरचनेमध्ये किंवा कार्यपध्दतीमध्ये सुधारणा करून दूर होणार नाही, तर संस्थेतील व्यक्तींच्या नियुक्त्या, अधिकारांचे वाटप करण्याची पध्दत ही देखील संस्थेच्या हिताला प्राधान्य देणारी असली पाहिजे. व्यक्तिगत नफ्या- तोट्याचा विचार करून चालणार नाही हे त्याने संस्थेच्या अधिकाऱ्यांना ठासून सांगितलं पाहिजे, पटवून दिलं पाहिजे. याकरीता आपल्या क्लायंट्सबरोबर उत्कृष्ट संवाद साधण्याचा त्यानं प्रयत्न केला पाहिजे.
 संस्थेतील अधिकारी जसे अप्रामाणिक असू शकतात तसे सल्लागारही अप्रामाणिक असू शकतात.ते अशी उपाययोजना निर्माण करतात की त्यातून नव्या समस्या निर्माण होतात आणि पुन्हा संस्थेला त्याच्याकडे सल्ल्याला यावं लागतं. संस्थांबाबतचे कायदे, नियम आणि व्यवस्थापनाची तत्त्वे यांच्याबाबत अनभिज्ञ असणाच्या संस्थाचालकांची अशा मार्गाने फसवणूक केली जाऊ शकते.

 स्वतचे शहाणपण सिध्द करण्यासाठी अनकदा सल्लागाराकडून आवश्यकता नसतानाही बदल सुचविले जातात. ज्याप्रमाणे काही डॉक्टर्सना भरमसाट औषधं लिहून देण्याची सवय असते, तसे काही व्यवस्थापकीय सल्लागारही असतात. जितकी जास्त औषधे देऊ तितका रुग्णाचा अल्पावधीत आपल्यावरील विश्वास वाढेल ही भावना त्यापाठी असते. पण अनावश्यक औषधं पोटात गेल्यानं रुग्णाला वेगळे त्रास होऊ शकतात. तसंच गैरवाजवी बदल सुचविल्यानं संस्थेचही नुकसान होऊ शकतं याचा विचार सल्लागारांनी केला पाहिजे.

संस्थांच्या समस्यांवरील उपाययोजना / २२९