पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/२२८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गुंतवितात. मात्र त्यांचा उद्देश सामाजिक कार्यकर्ता बनणंं हा नसून व्यावसायिकच असतो. अनेक मोठ्या कंपन्या सामाजिक उपक्रमांचंं आयोजन करतात. अशा कार्यक्रमात सहभागी झाल्यानं मोठ्या कंपन्यांच्या नजरेसमोर आपण राहू आणि त्याचा फायदा नवी नोकरी मिळण्यासाठी होईल ही अटकळ त्यासाठी असते. अनेक अधिकाऱ्यांनी हा पर्यायी मार्ग यशस्वीरीत्या वापरला आहे.
 त्याचप्रमाणंं प्रतिष्ठितांच्या क्लबजचंं सदस्यत्व घेणं, तिथं येणाऱ्या उच्चभ्रूंंशी संपर्क वाढविणंं, त्यांच्या खेळांमध्ये किंवा इतर कार्यामध्ये सहभागी होणंं, त्यांच्यावर आपली व्यक्तिगत छाप पडेल असे प्रयत्न करणंं हे काही अन्य मार्गही आहेत.
 या पर्यायी मार्गांंचा उपयोग स्वतःची प्रसिध्दी करण्यासाठी पारंपरिक मार्गापेक्षा अधिक होतो. त्यामुळंं तिथं वेळ आणि पैसा यांची गुंतवणूक करणंं जास्त फायद्याचं आहे असं अनेकांचंं मत आहे. मोठ्या कंपन्यांचे चालक, व्यवस्थापक इत्यादी मंडळी संशोधन संस्था किंवा व्यवस्थापकीय संस्थांच्या कार्यक्रमांपेक्षा कलकत्ता क्लब, बॉम्बे क्लब येथील कॉकटेल पार्ट्यात किंवा रॉयल गोल्फ कोर्सवरच अधिक आढळतात. त्यामुळंं अशा ठिकाणी शिरकाव करून त्यांच्या सान्निध्यात येणं हे सोपंही आहे आणि जास्त उपयुक्त आहे असं समजणाऱ्यांंचाही एक वर्ग आहे.
 सध्याच्या परिस्थितीत काही प्रमाणात हे खरं असेलही, पण व्यावसायिक गुणवत्ताच नजीकच्या काळात अधिक महत्त्वाची ठरणार आहे असं ज्यांना वाटतंं त्यांनी त्या आधारावरच स्वतःची प्रतिमा निर्माण करणं सुरक्षित आहे.
नवी नोकरी स्वीकारताना :

 सध्याच्या नोकरीवर आपण नाखुश आहोत हे ध्यानात ठेवून त्या कसोटीवरच नवी संधी तपासून पाहावी आणि ती स्वीकारायची की नाही याचा निर्णय घ्यावा हे महत्वाचं सूत्र आहे.

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/२१९