पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/२२२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नव्या संकल्पना राबविण्यास तयार नसतात. मालाला सुरक्षित बाजारपेठ असल्याने ती टिकून असते. मात्र, आणखी कंपन्यांना तीच वस्तू तयार करण्याचा परवाना मिळाला व स्पर्धा वाढली की अशा कंपन्या टिकू शकत नाहीत.
४. पक्षपाती विचारसरणीच्या कंपन्या :
 व्यक्तींप्रमाणेच कंपनीचीही विवक्षित विचारसरणी असू शकते आणि कित्येकदा ती पक्षपाती असू शकते. काही कंपन्या हे उघडपणानंं मान्य करतात, तर काही लपवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. केवळ ब्रिटिश चार्टर्ड अकाउंटन्टस् सक्षम असतात अशा समजुतीने माझ्या माहितीतील एक कंपनी त्यांनाच अर्थविभागाचं प्रमुखपद देत असे. तसंच अभियांत्रिकी विभागात पदोन्नती मिळविण्यासाठी अमेरिकेतील पदवी अनिवार्य असे. त्यामुळं अन्य देशांतील चार्टर्ड अकाऊंटन्ट किंवा अभियंते कितीही कर्तबगार असले तरी त्यांना उच्च पदांवर काम करण्याची संधी मिळणं दुरापास्त होतं.

 अयोग्य पध्दतीनं कार्य करणाऱ्या कंपन्यांची विभागणी सर्वसाधारणानं या चार गटांत होऊ शकते. म्हणूनच नोकरी पत्करण्यापूर्वी किंवा सोडण्यापूर्वी आपली कंपनी नेमकी कोणत्या प्रकारात मोडते आणि तीत आपला भविष्यकाळ कसा असेल याचा विचार व्यवस्थापकानं करावयास हवा. त्यासाठी कंपनीचं अध्ययन करायला हवं. बाहेरचा माणूस आपल्या कंपनीकडं जशा पध्दतीनं पाहील आणि मत बनवेल, तसा दृष्टिकोन ठेवल्यास निर्णय घेणंं सोपं होतं. सभोवतालचंं वातावरण व आपलं काम यांचंं समालोचन कसं करायचं ते पुढील लेखात पाहू.

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/२१३