पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/२१७

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


चालली आहे. या परस्परविरोधी वातावरणामुळे व्यवस्थापकाला किंवा कर्मचाऱ्याला एकाच वेळी नव्या संधी आणि अस्थिरता अशा दोन्हींचा सामना करावा लागत आहे.
 गेली पंचवीस वर्षे बहुतेक सर्व प्रस्थापित कंपन्यांचा विकास व वाढ होत राहिली. त्यामुळं कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची वेळ कमीच येत असे. मात्र, व्यवसाय वाढण्याऐवजी कमी होण्याचा अनुभव प्रथम खासगी क्षेत्रातील तेल कंपन्यांना आला. त्यानंतर दीर्घकालीन मंदीची लाट आली. त्यामुळं इतर उद्योगांनाही त्याचा फटका बसला. मग खर्च कमी करण्यासाठी कर्मचारी व व्यवस्थापक यांची काटछाट सुरू झाली.
 ही स्थिती कशी आहे, हे एका चाळिशीतल्या व्यवस्थापकाच्याच शब्दांत सांगतो. ‘एका तेल कंपनीत मी १२ वर्षे काम केलं. मी अतिबुध्दिवान समजलो जात नव्हतो तरी सर्वसामान्यांपेक्षा वरचा होतो. कंपनीचा विस्तार होत गेला तसा मी उच्च स्थानांवर पोचलो. मला पगार चांगला होता आणि नोकरीची शाश्वती असल्याने मी तो खर्च करत गेलो. एके दिवशी माझ्या बॉसनं मला बोलावलं आणि कंपनीच्या अडचणींची यादीच माझ्यासमोर वाचून स्वेच्छानिवृत्ती घेण्याची सूचना केली. मला मिळणारी भरपाईची रक्कम आकर्षक होती, पण नंतर काय करायचं या विचारानं मला अक्षरश: घाम फुटला. कारण या नोकरीत मिळणाऱ्या पगाराच्या अर्धा पगार मिळविण्यासाठीही काय करावं लागतं याची मला जाणीवच नव्हती.’
 गेल्या काही वर्षांत आणखी एका अनोख्या कारणामुळे नोकरीची अस्थिरता निर्माण झाली आहे. त्याचे उदाहरण पाहण्यासारखे आहे. एका मोठ्या विदेशी कंपनीनं भारतात उपकंपनी सुरू केली. तिचा भारतातील व्यवसाय उत्तम होता. ती विदेशी कंपनी आणखी एका कंपनीने विकत घेतली. खरेदीदार कंपनीचीही भारतात शाखा होती. त्या शाखेने सहाजिकच पहिल्या कंपनीची भारतातील शाखा विकत घेतली. खरेदीदार कंपनीतील व्यवस्थापक वर्ग तरुण व पहिल्या कंपनीतील व्यवस्थापकांपेक्षा कमी पगारावर काम करणारा होता. आता कमी पगारवाल्यांची कंपनी मालक झाल्यानंतर तिनं पध्दतशीरपणे जास्त पगारवाल्या कंपनीतील व्यवस्थापकांची छाटणी सुरू केली. सध्या 'टेक ओव्हर'चं युग असल्यानं अशी उदाहरणं मोठ्या प्रमाणावर पाहावयास मिळत आहेत.
प्रतिष्ठेचा प्रश्न :

 कंपनीच्या एखाद्या प्रकल्पाची जबाबदारी आपल्याला मिळावी अशी त्यातील ज्येष्ठ व्यवस्थापकाची इच्छा असते. त्याने तो प्रश्न प्रतिष्ठेचा केलेला असतो. मात्र, त्याची इच्छा फेटाळली जाते. अशा वेळी तो नाराज होऊन नोकरी सोडण्याचा विचार करतो.

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची /२०९