पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/२१२

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


सीमाविरहीत जगातील व्यवस्थापन (भाग पहिला)

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf

गाची विभागणी करण्याची सवय फक्त जमिनीवरील प्राण्यांनाच असते. पक्षी - संपूर्ण आकाशात विहार करतात, तर माशांसाठी सर्व समुद्र मोकळा असतो. त्यात त्यांनी स्वतःसाठी स्वतंत्र विभाग ठरवून घेतलेले नसतात, मात्र जमिनीवरील प्राणी स्वतःचे संरक्षण करण्याकरिता व अन्नपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी स्वतःच्या विभागची सीमारेषा आखून घेतात. सीमा आखून घेण्याची प्रत्येक प्राणी जातीची पध्दत वेगवेगळी असते.

 माणसाला भिंती उभारून स्वतःची सीमारेषा ठरविण्याची सवय असते. यापैकी काही भिंती नैसर्गिक असतात. नद्या, पर्वतरांगा, समुद्र वगैरे. तर काही भिंती या मुद्दाम बांधल्या जातात. उदाहरणार्थ, बर्लिनची भिंत, चीनची अजस्त्र भिंत इत्यादी. या भिंती उभ्या करण्याच्या सवयींतूनच भौगोलिकदृष्ट्या वेगवेगळी राष्ट्र निर्माण झाली.

 या भिंतींप्रमाणेच माणसाच्या मनातही काही भिंती उभ्या असतात. 'युध्द ही रणभूमीवर नव्हे तर माणसांच्या मनात सुरू होतात. त्यामुळे शांतीचे बालेकिल्लेसुध्दा माणसांच्या मनातच निर्माण झाले पाहिजेत.' असं युनेस्कोच्या प्रिअँँबलमध्ये म्हटलं आहे. या मनातील भिंतीमुळं युध्द आणि सीमाविवाद निर्माण होतात.

 अन्नाच्या तुटवड्यामुळे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता असल्याने पूर्वीच्या काळी अशा संरक्षक भिंतीची आवश्यकता भासत होती, पण तो काळ आता बराच मागं पडला आहे. आधुनिक तंत्रज्ञानानं अन्न व इतर अनेक आवश्यक वस्तूंचा तुटवडा आटोक्यात आणला आहे. अनेक विकसित देशांमध्ये तर कुपोषणामुळे नव्हे तर नको तक खाण्यामुळे समस्या निर्माण होत आहेत. अन्य देशांमध्ये दुष्काळ, वादळ, महापूर नैसर्गिक संकटे उदभवल्यास तेथे धान्य पुरवठा करण्याइतकी कित्येक राष्ट्र सबळ आहेत. मालवाहतूक क्षेत्रातही क्रांती झाल्यानं असा पुरवठा त्वरित करता येतो. तरीही जगात भूकबळी पडण्याची उदाहरणं नित्य घडतात. ती अन्नाचा तुटवडा आहे म्हणून नव्हे, तर त्याचं वाटप अयोग्य पध्दतीनं होतं म्हणून. मग प्रश्न असा की, अशा समृध्द जगात आज सीमारेषा आणि जमिनीचे तुकडे पाडणाऱ्या भिंती यांची खरोखरच आवश्यकता

अद्भुतदुनिया व्यवस्थापनाची/२०३