पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/२०६

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


विकसित देशांतील पैसा बाहेर जाऊ लागतो. तेथील नोकऱ्या कमी होतात. मग तो एक राजकीय मुद्दा बनतो. तेथील समाजात नाराजी निर्माण होते.
 भौगोलिक सीमारेषांचं महत्त्व कमी करणं आणि अंतिमतः सीमाविरहित जग निर्माण करणं हा या समस्येवर उपाय आहे.या नव्या सीमाविरहित जगात उत्पादनं, माणसं आणि सेवा कुठूनही कुठेही मुक्तपणानं संचार करू शकतील ही जागतिकीकरणाची प्रक्रिया गॅट करारानं यापूर्वीच सुरू केली आहे.सर्व देशांनी आयात मालावरील सीमाशुल्कात कपात करावी आणि उत्पादनं, त्यांची गुणवत्ता आणि संशोधन यावर भर द्यावा अशी शिफारस या करारात आहे. आऊटसोर्सिंगच्या माध्यमांतून मुक्त व्यापाराचं उद्दिष्ट काही प्रमाणात साध्य झालं आहे. मात्र, मुख्य अडचण माणसांच्या मुक्त स्थलांतराची आहे. मुक्त व्यापाराचं समर्थन करणारे अनेक देश इतर देशांतील लोकांना आपल्या देशात स्थलांतरित होण्यास प्रतिबंध करतात.आपले आणि परके ही भावना प्रत्येक देशाच्या सर्वसामान्य नागरिकांच्या मनात टिकून आहे. ती सहजासहजी दूर होणेही अशक्य आहे.
 स्थलांतरावरील कठोर प्रतिबंधांमुळे बेकायदेशीर देशांतराचा गंभीर प्रश्न अनेक देशांसमोर आ वासून उभा आहे.एखाद्या तुलनेनं विकसित राष्ट्रात त्याच्या अवतीभोवतीच्या अविकसित देशांतील लोक घुसखोरी करतात.मेक्सिकोतील लोक अमेरिकेत घुसखोरी करतात. इतकंच नव्हे तर बांगला देशातील लोक भारतात घुसखोरी करतात.आपल्या देशापेक्षा शेजारच्या देशात अधिक चांगलं जीवन जगायला मिळेल या भावना हे या स्थलांतरापाठीमागचं एक कारण आहे.

 या झपाट्यानं बदलणाऱ्या पाश्र्वभूमीवर उद्योग व्यवसायाच्या व्यवस्थापनाची शैली बदलणं आवश्यक आहे, त्याबद्दल पुढच्या लेखात पाहू.

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/२०५