पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१८८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

स्वयंव्यवस्थापन (भाग दुसरा)


तःची शक्तिस्थानं जाणताना स्वतःच्या बुध्दीबाबत गर्व न बाळगण्याची खबरदारी घेणं आवश्यक आहे. एखाद्या क्षेत्रात उच्च प्रतीचं ज्ञान असणाऱ्या बुद्धिमंतांना अन्य क्षेत्रातील ज्ञान मिळवणं कमीपणाचं वाटतं. एखाद्या कुशल अभियंत्याला

आपल्या सहकाऱ्यांच्या किंवा लोकांच्या भावना जाणून घेण्याची गरज वाटत नाही. तर एखाद्या तज्ज्ञ मनुष्यबळ व्यवस्थापकाला अकाऊंट्स या विषयातील ज्ञान घेणं कमीपणाचं वाटतं. सध्याच्या काळात ही वृत्ती उपयोगी पडणार नाही. आपली बुध्दी कोणत्या क्षेत्रात कशी चालते हे समजून घेण्यासाठी विविध क्षेत्रांत संचार करणं श्रेयस्कर आहे. या प्रयोगातून आपल्यातील नव्या शक्तिस्थानांचा शोध लागू शकतो.
 चुकीच्या सवयी सोडणंही तितकंच गरजेचं आहे. उदाहरणार्थ, एका निष्णात योजनाकारानं एखाद्या प्रकल्पाची योजना तयार केली. ती कितीही चांगली असली तरी तिची लक्षपूर्वक अंमलबजावणी न केल्यास ती अपयशी होऊ शकते. केवळ चांगल्या कल्पनेने पहाड हलविता येत नाही. त्यासाठी बुलडोझरच चालवावे लागतात. तेंव्हा चांगली योजना तयार केली म्हणजे आपलं काम झालं असं समजण्याची वाईट सवय टाळायला हवी. योजना अंमलात आणण्यासाठी योग्य त्या माणसांची जुळणी करणं, योजना कृतीत आणताना तीत करावे लागणारे बदल मोकळेपणाने स्वीकारणं आणि महत्त्वाचं म्हणजे योग्य वेळी योजनेचं क्रियान्वयन थांबवणं या बाबीही योजनाकारानं लक्षात घ्यावयास हव्यात.
अपेक्षा व फलनिष्पत्तीची तुलना :

 एखादं कार्य हातात घेण्यापूर्वी त्यातून आपल्याला काय मिळवायचं आहे यासंबंधी निश्चित अपेक्षा मनात असतात. कार्यपूर्तीनंतरच्या फलनिष्पत्तीशी या अपेक्षांची तुलना केल्यास कार्य कितपत नेटकेपणानं पार पडलं हे समजतं. यावरून काय करायला हवं होतं आणि काय करायला नको होतं हे कळून येतं, याचा उपयोग पुढच्या कामात होतो. ज्या ठिकाणी कार्यक्षमता कमी आहे तिथे ती सुधारण्यासाठी शक्ती व वेळ खर्च करण्यापेक्षा जिथे ती अधिक आहे, त्या ठिकाणी ती जास्त बलवान कशी करता येईल ते पाहणं अधिक उपयोगी ठरेल. उदाहरणार्थ, एखाद्या चांगल्या फलंदाजाने गोलंदाजी

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची / १७९