पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१८५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

स्वयंव्यवस्थापन (भाग पहिला)


कविसावं शतक जीवघेण्या स्पर्धेचं आहे. प्रत्येक व्यक्तीने स्वतःला व्यवस्थित 'सांभाळणं' म्हणजेच स्वतःचं 'व्यवस्थापन करणं', स्वतःचा विकास करणं आणि या जगात स्वतःसाठी एक स्थान निर्माण करणं आवश्यक आहे.आपली आर्थिक स्थिती कशीही असली, तरी हे स्वयंव्यवस्थापन आपल्याला शिकावंच लागणार आहे.स्वयंव्यवस्थापन म्हणजे काय आणि ते कसं करावं याचा विचार या व यापुढील काही लेखांत करणार आहोत.

स्वतःची शक्तिस्थानं जाणणं :
 २० व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत स्वतःची शक्तिस्थानं जाणण्याची आवश्यकताच माणसाला वाटत नव्हती. जन्मापासून प्रत्येकाचं समाजातलं स्थान,त्याने करावयची कामं, त्यांच्याबद्दल त्याला मिळणारा मोबदला या गोष्टी परंपरेनेच ठरविल्या जात. शेतकराच्या मुलानं शेतकरी तर सुताराच्या मुलानं सुतार व्हायचं हे विधिलिखिताप्रमाणं निश्चित असे. त्याचप्रमाणे शेतकऱ्याच्या मुलीचा विवाहही शेतकऱ्याच्याच मुलाशी तर वैद्याच्या मुलीचा विवाह वैद्याच्याच मुलाशी होत असे. माणसाचं काम करण्याचं पिढीचं करिअर असे.
 विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून या स्थितीत कमालीचा बदल होत आहे. ठराविक व्यक्तींनी ठराविकच व्यवसाय करायचं बंधन उखडलं गेलं आहे. ज्याला ज्यात स्वारस्य आहे आणि ज्याला ते करण्याची संधी आहे,करण्याचं स्वातंत्र्य २० व्या शतकानं मिळवून दिलं आहे. थोडक्यात ‘जो जे वांछील,तो ते लाभो’अशी स्थिती आहे.

 यामुळं व्यक्तिगत प्रगती व विकासाचे मार्ग मोकळे झाले असले तरी, सामाजिक व आर्थिक अस्थिरता निर्माण झाली आहे.आपल्याला 'नेमकं' काय करायचं आणि आपल्याला नेमकं काय जमेल याचा ताळमेळ घालणे आणि त्याप्रमाणं करिअरची दिशा ठरवणं,किंवा त्यानुसार करिअर बदलणं हि काळाची गरज बनली आहे.

स्वयं व्यवस्थापना: २१ व्याशतळाचीगरज / १७६