पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१७१

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


पर्याय मित्रत्वाच्या संबंधांचा :
 एकविसाव्या शतकात या संबंधांना 'मित्रत्व' हा सर्वोत्तम, समर्थ आणि अधिक चांगला पर्याय ठरू शकतो. नातं तेच पण संबंध मित्रत्वाचे असतील तर अनेक बाबतीतला अनावश्यक संघर्ष व अन्याय टाळता येतो. मित्रत्वात टोकाची भूमिका संभवत नाही. दोन्ही बाजूंनी एकमेकांचे अधिकार, महत्त्व, उपयुक्तता, मर्यादा आणि क्षमता यांचा मान ठेवण्याचे भान केवळ मित्रत्वातच असू शकते. असे संबंध प्रस्थापित करणं हे एकविसाव्या शतकातलं मोठे आव्हान आहे. पिता-पुत्र, पती-पली आणि मालक - सेवक यांना ते पेलावं लागणार आहे.
 मित्रत्वाचं नातं मुख्यत: विश्वासावर अवलंबून असतं. सर्वसाधारणपणे आपल्याला दोन तऱ्हेचं भय वाटत असतं. एक आपण कुणाकडून दुखावले तर जाणार नाही? मित्रत्वाच्या संबंधांमधून या दोन्ही प्रकारच्या भीती नाहीशा होऊ शकतात. कारण, त्यात मोकळेपणा असतो.
 मला जेव्हा पहिला बोनस मिळाला तेव्हा मी घरात घोषणा केली, 'आता मी स्वतःला सफारी सूट घेणार', ते ऐकून पत्नी म्हणाली, ‘घ्याच तुम्ही सफारी सूट. खरं म्हणजे माझ्यासाठी साडी आणता का असं मी विचारणार होते, पण माझ्याकडं एकच का असेना पण चांगली साडी आहे. तुम्हाला मात्र चांगला सूट नाही.' ते ऐकून मला माझीच लाज वाटली. वास्तविक तिच्याजवळ लग्नकार्यात नेण्यासारखी एकच चांगली साडी आहे. त्यामुळं बोनसवर खरा अधिकार तिचा आहे हे मला माहीत होतं. अखेरीस सूट रद्द करून मी साडी खरेदी केली. अगदी मनापासून.
 माझे पत्नीशी मित्रत्वाचे संबंध असल्यानेच हे शक्य झालं. मी जन्या वळणाचा नवरा असतो तर तिला न विचारता मी सूट खरेदी करूनच घरात आलो असतो. पत्नी काही बोलली नसती, पण मनात दुखी झाली असती. केवळ संबंधातील मोकळेपणामुळं तिनं युक्तीनं मला न दुखावता तिची गरज माझ्या कानावर घातली आणि मीही माझा विचार बदलला.

 एकविसाव्या शतकातील कोणत्याही क्षेत्रातल्या व्यवस्थापकांनी संबंधातील हे बदल जाणणं आणि त्याप्रमाणं धोरण आखणं आवश्यक आहे. संस्थेचे मालक, कर्मचारी, ग्राहक, पुरवठादार तसेच समाजाचे इतर घटक यांच्याशी व्यवस्थापकाचा संबंध हरघडी येतो. त्याला काही वेळा हुकूम करणाऱ्याची तर काही वेळा हुकूम मानणाऱ्याची भूमिका निभवावी लागते. ती उत्तम पार पाडावयाची असेल तर आपल्याला आज्ञा देणाऱ्याशी व आपण ज्याला आज्ञा देतो त्याच्याशी मित्रभावनेनं वागण्याचा त्याचा प्रयत्न असल्यास त्याचं काम सुकर होतं.

युग बदलत्या संबंधांचं/१६२