पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१७०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अंतर असे. उदाहरणार्थ, बापानं वीस वर्षात कमावलेलं कौशल्य मिळवण्यासाठी मुलालाही जवळपास तेवढीच वर्षे राबावं लागत असे. साहजिकच या काळात बाप सांगेल तसं वागणं त्याला भाग असे. मुलानं दुसरा मार्ग चोखाळलेला समाजालाही मान्य होत नसे.
 गेल्या पन्नास वर्षांत परिस्थिती झपाट्यानं बदलली. मुलं बापाचं 'ऐकण्या'पेक्षा त्याला 'विचारू' लागली. आज्ञाधारकपणाऐवजी चौकसपणा हा गुण मानला जाऊ लागला. पूर्वी मुलगा आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या 'पायावर' उभा राहू लागल्यापासूनच हे करावं लागलं. यामुळं मधल्या एका पिढीची अवस्था अशी झाली की, तिला लहानपणी बापाचं आणि मोठेपणं मुलांचं ऐकावं लागलं. एका प्रसिध्द लेखकानं आपल्या गोष्टीत म्हटलं आहे, 'लहानपणी आम्ही आई-वडिलांच्या गाद्या घातल्या. आता मुलांच्या घालत आहोत.' वडिलधाच्या व्यक्तीच्या गाद्या घालण्याचं काम पूर्वी मुलांना करावं लागत असे. आता हे ‘संबंध’ बदलले.
पती-पत्नी संबंध :
 पतीने बाहेर काम करून पैसा मिळवायचा आणि पत्नीने घर सांभाळायचं ही पूर्वीची रीत त्यामुळं निर्णय घेण्याचे सर्वाधिकार पतीकडे आणि ते पाळण्याची जबाबदारी पत्नीकडे अशी कामाची विभागणी होती. हे संबंध आता केवळ बदललेच नाहीत तर नाहीसे होण्याच्या मार्गावर आहेत. केवळ चूल आणि मूल यात कुलूपबंद असणाऱ्या महिला आता पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रांत उतरल्या आहेत.
मालक - सेवक संबंध :
 मालक अन्नदाता असल्यानं त्याचं श्रेष्ठत्व निर्विवाद होतं. औद्योगिक क्रांतीनंतर मालकांनी आपली जबाबदारी बव्हंशी व्यवस्थापकांवर टाकली. मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन व्यवस्थापक नोकरांवर ‘मालकगिरी’ गाजवू लागले. हा बदल कित्येक कामगारांना भावला नाही. परिणामी त्यांनी संघटना सुरू करून व्यवस्थापक व मालक यांच्याशी लढा पुकारला. मार्क्सवादाने या लढ्याला तात्विक अधिष्ठान मिळवून दिलं. कामगारांना चांगला पगार व अधिकार यामुळे मिळाले, पण मालक व व्यवस्थापनाबरोबर त्यांचे संबंध संघर्षाचेच राहिले.

 परंपरेनं विकसित झालेल्या या तीनही संबंधांमध्ये एक समान दुवा होता. तो म्हणजे, यातील एक पक्ष आज्ञा करणाऱ्याचा तर दुसरा आज्ञा पाळणाऱ्याचा. शिवाय आज्ञा व कुणी ती पाळावयाची हे बौध्दिक पात्रतेवर न ठरता, परस्पर संबंधांवर ठरत असे. म्हणजेच मुलगा, पत्नी आणि सेवक अनुक्रमे पिता, पती आणि मालक यांच्यापेक्षा बुध्दिमान असले तरी त्यांना हुकूम पाळावा लागत असे. साहजिकच समाजाच्या एका बाजूवर सतत अन्याय होत गेला.

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/१६१