पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१५५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

येणारे काही निवडक क्लायंटस् कायमचे आपल्याकडं राहतील याची दक्षता घ्या. कधी तरी काम घेऊन येणाऱ्या पुष्कळ क्लायंट्सपेक्षा हे निवडक पण नेहमी येणारे आपली अधिक प्रसिध्दी करतात हे सूत्र लक्षात ठेवा.
४) आपला व्यवसाय वाढल्यानंतर क्लायंटसाठी खर्च करावा लागणारा वेळ व त्याच्याकडून होणारी आर्थिक प्राप्ती यांचा ताळमेळ व्यवस्थित बसवा. कमी फी देणारे पण जास्त वेळ घेणारे क्लायंटस् सरळ नाकारा. अशा लोकांमुळे आपण स्वस्त’ आहोत अशी भावना समाजात निर्माण होऊन आपल्या गुणवत्तेबद्दल शंका निर्माण होते. त्याऐवजी चांगली फी देणाऱ्यांवर पूर्ण लक्ष केंद्रित करा.
शेरेबाजी जाहीररीत्या नको :
५) आपला व्यवसाय वाढल्यानंतर आजारी किंवा मोडकळीस आलेल्या संस्थांची कामं विचार करून घ्या. कारण अशा संस्था अन्य कारणामुळं बंद पडल्या तरी त्या तुमच्या सल्ल्यामुळंच बंद पडल्या अशी प्रसिध्दी होते.
६) नेहमी येणाऱ्या क्लायंट्सची संख्या वाढती राहील याची दक्षता घ्या. कारण जुने क्लायंटस् कालांतरानं तुम्हाला कामं देणं बंद करू शकतात किंवा ते आपला उद्योगव्यवसाय बंद करू शकतात. आपल्याकडं काम देणाऱ्या संस्थेचा प्रमुख बदलला तर तो आपलं वेगळंं वैशिष्ट्य दाखविण्यासाठी पूर्वीच्या प्रमुखानं घेतलेले निर्णय बदलतो आणि त्याची सुरुवात सल्लागार बदलण्यापासून होते. त्यामुळं आपल्याकडे वाढते क्लायंट्स असू द्या.
७) आपलं स्पेशलायझेशन सोडून इतर क्षेत्रांत लक्ष घालू नका. अपुऱ्या ज्ञानापोटी आपण चुकीचा सल्ला दिला, तर क्लायंटचं नुकसान होऊ शकतं. त्याचा परिणाम असा होतो की, ज्या क्षेत्रात आपलं स्पेशलायझेशन आहे, त्या क्षेत्रातील काम मिळणंही मग मुश्किल होतं.
८) आपल्या प्रतिस्पर्धांबाबत योग्य अथवा अयोग्य अशी शेरेबाजी खाजगी किंवा जाहीररीत्या करू नका. आपल्याबद्दलही प्रतिस्पर्धी असंच बोलू शकतो याचं भान ठेवा. तसंच अशा शेरेबाजीमुळं आपल्याबद्दल मत वाईट होतं हे लक्षात असू द्या. हे मुद्दे केवळ व्यवस्थापकीय सल्लागारांनाच नव्हे तर इतर कोणत्याही क्षेत्रातील सल्लागारांना लागू आहेत. या सर्वांचा विचार करून स्वतःची दिशा ठरविल्यास फायदा होईल.

व्यवस्थापकीय सल्लागार/१४६