पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१५४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 याखेरीज स्वतंत्र सल्लागारांना आणखी एका समस्येला आता तोंड द्यावं लागत आहे, ती म्हणजे त्यांची वाढती संख्या. सध्या कर्मचारी - कपातीची लाट आल्यानं औद्योगिक किंवा इतर संस्थांमध्ये काम करणाऱ्या पन्नाशीच्या घरातील अनेक व्यवस्थापकांवर सक्तीच्या निवृत्तीची कुऱ्हाड कोसळली आहे. अशांसमोर सल्लागाराचा व्यवसाय पत्करण्यावाचून गत्यंतर राहिलेलं नाही. साहजिकच कामाचा ओघ कमी आणि व्यावसायिकांची संख्या मात्र जास्त असं चित्र व्यक्तिगत व्यवसाय करणाऱ्यांबाबत दिसत आहे.
व्यावसायिक अस्तित्वासाठी :
 स्वतंत्र सल्लागाराचा व्यवसाय करणाऱ्या ज्या व्यक्तीकडे ज्ञान आणि क्षमता आहे, त्यांच्याकडं प्रसिध्दी असेलच असं नाही. नाव कमावल्याशिवाय काम मिळत नाही आणि काम मिळाल्याशिवाय नाव कमावता येत नाही अशा कात्रीत कित्येक स्वतंत्र व्यावसायिक सापडलेले दिसतात. ‘क्लायंट्स' मिळविण्यासाठी केवळ ज्ञान असून उपयोग नसतो. ते आहे, हे लोकांना माहीत असणं महत्वाचं असतं. संस्थेच्या बाबतीत ही अडचण कमी जाणवते.
 अर्थातच, व्यवसायात टिकून राहण्यासाठी स्वतंत्र सल्लागार व्यावसायिकाला प्रतिस्पर्धी आणि या व्यवसायात उतरलेल्या संस्था अशा दुहेरी स्पर्धेला तोंड द्यावं लागतं. व्यावसायिक अस्तित्वासाठी ही लढाई त्याला सतत सुरू ठेवावी लागते.
 यात यशस्वी व्हायचं असेल तर अशा व्यक्तींनी पुढील काही नियम पाळणं आवश्यक वाटतं.

  1. स्वत:ला कायम प्रसिध्दीच्या झोतात ठेवा. आपलं ज्ञान सिध्द करण्यासाठी वृत्तपत्रं व नियतकालिकांतून लेख लिहिणं, जाहीर परिसंवाद, चर्चासत्र यात भाग घेणं, भाषण करणं इत्यादी मार्गांनी लोकांच्या नजरेसमोर राहा. मात्र, धार्मिक किंवा राजकीय व्यासपीठावरून स्वतःची प्रसिध्दी करण्याचा मोह टाळा.
  2. स्वतःचं ज्ञान, क्षमता, स्पेशलायझेशन इत्यादींबाबत प्रसिध्दिपत्रकं (ब्राऊशर्स), सीडी आकर्षकपणे तयार करून ती नित्यनेमानं विविध औद्योगिक संस्थांना पाठवत राहा. केवळ व्यक्तिगत ओळखींवर काम मिळेल अशा भ्रमात राहू नका. ओळखीमुळं सुरुवातीच्या काळात काही कामं मिळतात, पण ती टिकून राहतील याची खात्री नसते. शिवाय आपण क्षमतेवर नव्हे, तर ओळखीवर कामं मिळवता, अशा अफवा आपल्या प्रतिस्पर्ध्यांकडून उठवल्या जाण्याची शक्यता असते. त्याचा परिणाम व्यवसायावर होऊ शकतो.
  3. आपल्याकडे दीर्घकाळ टिकून राहिलेले क्लायंट्सच आपल्याला नाव मिळवून देतात. 'फी'च्या मोहापायी कामाचा भार वाढवून घेण्यापेक्षा, नेहमी सल्ल्याला
    अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/१४५