पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१५३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

होता. एखाद्या व्यक्तीची क्षमता आजमावून संस्था तिची सल्लागार म्हणून नियुक्ती करीत असत. संस्थेला कोणत्याही बाबतीत अडचण अगर समस्या आली की, तिचा सल्ला घेतला जात असे. आताही ही पध्दत सुरू आहे. पण स्वतंत्र सल्लागार संस्थांची जबरदस्त स्पर्धा जाणवू लागली आहे.

 काही वर्षांपूर्वी स्टेट बँक ऑफ इंडिया प्राध्यापक ईश्वर दयाळ यांचा सल्ला घेत असे. आता तिनं मॅक कॅन्सी या सल्लागार कंपनीकडं हे काम सोपवलं आहे. तसंच राज्याच्या आर्थिक व प्रशासकीय व्यवस्थापनाबाबत आंध्र प्रदेशचे दिवंगत मुख्यमंत्री एन.टी. रामाराव, मिनू रुस्तुमजी या नावाजलेल्या व्यवस्थापन तज्ज्ञांचा सल्ला घेत असत. चंद्राबाबू नायडूंनी ही जबाबदारी मॅक कॅन्सी कंपनीवरच सोपविली आहे.

स्पेशलायझेशन :

 एका व्यक्तीपेक्षा संस्थेकडे सल्ल्याचं काम देण्याकडं कल वाढण्याची काही सबळ कारणं आहेत. एका व्यक्तीपेक्षा संस्थेचा आवाका मोठा असतो. तिथं अनेक व्यक्ती काम करीत असल्याने कामाची विभागणी सुयोग्य पद्धतीनं केलेली असते. व्यवस्थापनशास्त्रातही आता वैद्यकीय व्यवसायाप्रमाणं 'स्पेशलायझेशन' आलेलं आहे. त्यामुळं एकाच व्यक्तीला व्यवस्थापनाचे सर्व पैलू माहीत असण्याची शक्यता कमी असते. संस्थेत अनेक तज्ज्ञ काम करीत असल्याने संस्थेच्या गरजेप्रमाणं सल्लागार संस्था त्या - त्या तज्ज्ञांची नियुक्ती करून समस्या सोडवू शकते.

 ज्ञानवैविध्याबरोबराच सल्लागार संस्थेकडे अत्याधुनिक तंत्रज्ञान मिळविण्यासाठीची क्षमता स्वतंत्र व्यक्तीच्या तुलनेत अधिक असते. कारण संस्थेकडे पैसा व मानवबळ अधिक असतं. एक व्यक्ती व्यवस्थापनाच्या एकाच पैलूपुरतं सर्वंकष ज्ञान किंवा तंत्रज्ञान मिळवू शकेल ती सर्वज्ञानी असू शकत नाही.

 व्यक्तीचं वय वाढतं तशी तिची नवीन ज्ञान स्वीकारण्याची क्षमता कमी होत जाते. पण संस्थेत नित्य नव्या व तरुण कर्मचाऱ्यांची भरती होत असल्यानं ती चिरतरुण राहु शकते. परिणामी एकेकाळी अनुभव वयावर आणि ज्ञान अनुभवांवर अवलंबून असतं असं मानलं जात होतं. पण आता तंत्रज्ञानात झपाट्यानं सुधारणा व बदल होतं असल्यानं ताज्या ज्ञानाला मागणी अधिक आहे. सल्लागार संस्थेचं वय कितीही अधिक असलं, तरी तेथे काम करणारे व्यवस्थापक तरुण असू शकतात. असं एका स्वतंत्र व्यक्तीबाबत घडू शकत नाही.

 या सर्व कारणांमुळं एका व्यक्तीचा सल्ला घेण्यापेक्षा संस्थेकडे काम सोपवणं पसंत केलं जातं. त्यामुळे व्यक्तिगत पातळीवर सल्लागाराचं काम करणाऱ्यांची परिस्थिती अवघड झाली आहे.

व्यवस्थापकीय सल्लागार/१४४