पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१४५

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


बाबतीत शिथिल असेलच असंही नाही. तरुणांना लाजवेल अशा धडाडीने काम करणारे वयस्कर कर्मचारी संख्येने कमी असले तरी असतात. त्यामळे या बाबतीत सरकसट एकच नियम लावून चालत नाही. असं केल्यासही संस्थेचं नुकसान होण्याची शक्यता असते.
 तरीही सध्याच्या गळेकापू स्पर्धेच्या युगात तरुणांचं पारडं जड झाले आहे. ज्येष्ठ कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार आहे. त्यांच्या दृष्टीनं ही स्थिती कितीही नकोशी असली तरी ती वस्तुस्थिती आहे, हे नाकारण्यात अर्थ नाही. संस्था ही केवळ भावनेच्या आधारावर आणि कर्मचाऱ्याचा पूर्वेतिहास लक्षात घेऊन ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना फार काळ पोसू शकत नाही. कारण अन्यं कारणं कितीही सबळ असली तरी, आर्थिक नफा- नुकसान हा संस्थेच्या दृष्टीने कळीचा मुद्दा असतो. त्यामुळं काळाची पावलं ओळखून वयस्कर कर्मचाऱ्यांनी आपल्या करिअरचं व्यवस्थापन केलं पाहिजे असा विचार सध्या उद्योगविश्वात दृढ होत आहे. यातुनच 'दुसऱ्या करिअर'ची संकल्पना आकार घेत आहे.
 विशेषतः विविध क्षेत्रांतील उच्चपदस्थांनी याकडे गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे. अशा कर्मचाऱ्यांना पगार चांगला असल्यानं त्याचं जीवनमान उच्च असतं. निवृत्तीच्या वयापूर्वीच नोकरी गमवावी लागली किंवा निवृत्तीनंतर आर्थिक प्राप्ती कमी झाली तरी ‘लाईफ स्टाईल'मध्ये फारसा फरक पडू नये यासाठी उत्पन्नाचा ओघ कायम ठेवणं त्यांच्या दृष्टीनं गरजेचं असतं.
 इतिहासाकडे धावती नजर टाकली असता असं दिसून येतं की, मानवी संस्कृतीची पहिली काही हजार वर्षे धर्मापासून राजसत्तेपर्यंत व व्यवसायापासून कुटुंबापर्यंत सर्व सत्तास्थानं वृध्दांच्या हाती होती. किंबहुना 'वृध्दत्व' ही अधिकारप्राप्तीसाठी सर्वात महत्त्वाची गुणवत्ता मानली जात होती. त्यांनी सत्ता गाजवायची, आपल्या प्रजेची काळजी वाहायची आणि तरुणांनी त्यांच्या आज्ञेत राहावयाचं अशी जनरीत होती.

 त्या काळी राजसत्तेपासून घराण्याच्या व्यवसायापर्यंत सर्व गोष्टींचं तंत्रज्ञान वृद्ध पिढीकडून तरुणांना मिळत असे. त्यामुळे ते मिळविण्यासाठी तरुण पिढीला वडिलधाऱ्यांंच्या अधिकाराखाली राहणं अनिवार्य असे. वडिलोपार्जित उद्योग,शेतीवाडी,पशुपालन आदींच्या तंत्रज्ञानात बदल होत नसे. हजारो वर्षे ते एकाच पध्दतीने करण्यात आले. शेतकऱ्याचा मुलगा शेतकरी होणार, सुताराचा मुलगा सुतार तर वैद्यांचा वैद्य, हे त्याच्या जन्मापासून ठरलेलं असे. त्यामुळे बुजुर्ग कुटुंबप्रमुखांकडून व्यवसाय चालविण्याचं ज्ञान घेणं, त्यानुसार व्यवसाय चालवणंं आणि आपल्या वृध्दपणी आपल्या मुलाला ते ज्ञान देणं अशी रीत पिढ्यानपिढ्या चालू राहिली. त्या काही बदलांपेक्षा टिकाऊपणाला महत्त्व अधिक होतं.

दुसरं करिअर/१३६