पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१४२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 व्यवस्थापन प्रशिक्षकाच्या संदर्भात तर ही बाब फारच महत्त्वाची आहे. कारण कोणत्याही क्षेत्राचं व्यवस्थापन हा एक सांघिक खेळच आहे. याही खेळात महान खेळाडूंच्या जिवावर सामने जिंकले जाऊ शकत नाहीत तर व्यवस्थापनातील प्रत्येक स्तरातील व्यक्तीने त्याची जबाबदारी पार पाडावी लागते. तरच लक्ष्याचा पाठपुरावा यशस्वीपणे करता येतो.
 याचमुळे व्यवस्थापन प्रशिक्षकाला प्रशिक्षणार्थींमध्ये सांघिक भावना निर्माण होईल, अशा पध्दतीने कार्यक्रम आखावा लागतो. तो प्रशिक्षणार्थींना भावण्यासाठी त्यांच्याबरोबर परिणामकारक संवाद साधावा लागतो.
 संवाद साधण्याची ही कला कष्टसाध्य आहे. ती दुसऱ्याचं अनुकरण करून साध्य होत नाही. एखाद्या प्रशिक्षकांची कार्यशाळा घेण्याची शैली आवडली की, इतर अनेक प्रशिक्षक त्याच शैलीचे अनुकरण करू लागतात. पण ज्याचं आपण अनुकरण करतो त्याचे व्यक्तिमत्त्व, विषयाची जाण, बौध्दिक क्षमता आपल्याहून भिन्न असते. त्यामुळे अशी कॉपी करणे यशस्वी ठरत नाही, याचे भान प्रशिक्षकाला असावयास हवं. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या अंगभूत गुणांचा व वैशिष्ट्यांचा विचार करून स्वतःची शैली विकसित व ती लोकप्रिय करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
शिकविण्याचे मुद्दे :
 शिकविण्याच्या शैलीप्रमाणेच नेमकं काय शिकवायचं याचा प्रशिक्षकाला सांगोपांग विचार करून कार्यक्रम ठरवावा लागतो. शाळेतील शिक्षक व व्यवस्थापन प्रशिक्षक यासंदर्भात मोठा फरक आहे. शालेय किंवा महाविद्यालयीन शिक्षकाने काय शिकवायचं ते ठरलेलं असतं. इच्छा असूनही तो त्यात बदल करू शकत नाही. त्याच्यासमोर केवळ कसं शिकवायचं हाच प्रश्न असतो.
 व्यवस्थापन प्रशिक्षकाला मात्र काय शिकवायचं आणि कसं यावर समान लक्ष पुरवावं लागते. कारण विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या संस्थांकडून त्याला प्रशिक्षणासाठी बोलावणं येऊ शकतं. त्यांच्या आवश्यकता वेगवेगळ्या असतात. त्या जाणून घेऊन आपल्या कार्यक्रमात ऐन वेळी बदल करावे लागतात.
 शिकविण्याच्या मुद्यांबाबतही ख्यातनाम प्रशिक्षकांची कॉपी करण्याचा मोह नवोदित प्रशिक्षकांना अनावर होतो. अनेक प्रशिक्षक साचेबध्द पध्दतीचे खेळ, नाट्यसंवाद, इत्यादी माध्यमांमधून शिकविणं पसंत करतात. पण कित्येक संस्थांमधून कर्मचाऱ्यांनी अशा अनेक कार्यशाळांना उपस्थिती लावलेली असते. त्यांना हे खेळ,संवाद इत्यादी अगोदरच माहिती असण्याची शक्यता असते. मग असे कार्यक्रम कंटाळवाणे होतात.

 प्रत्येक शिक्षकाने स्वतःचं ‘स्टडी मटेरियल’ तयार करून त्याआधारे कार्यक्रम देणं

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/१३३