पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१४१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आदर्श शिक्षक. कारण जे मनात शिरत नाही, त्याबद्दल प्रेम निर्माण होत नाही आणि प्रेम निर्माण झाल्याशिवाय ते ‘आपले’ व्हावं असं वाटत नाही. तेव्हा विद्यार्थ्याला विषय ‘आपला' वाटावा अशी शिकविण्याची शैली विकसित करणं आवश्यक आहे. व्यवस्थापन प्रशिक्षकांची हे तत्त्व अंगीकारले पाहिजे.
 काही शिक्षक एखाद दुसऱ्या विद्यार्थ्याला चांगलं शिकवू शकतात. पण एकाच वेळी चाळीस पन्नास विद्यार्थ्यांसमोर त्यांचा रंग उडून जातो. विशेषत: विविध वयाच्या आणि विभिन्न शैक्षणिक पात्रता असणाऱ्या मोठ्या विद्यार्थी गटाला एकच विषय सलग अनेक तास शिकविण्याची वेळ आली की, विद्वज्जड व तज्ज्ञ शिक्षकांचीही भंबेरी उडते. कारण शिकवणं आणि व्यक्तीशी संवाद साधणं यात मूलभूत फरक आहे.प्रशिक्षकाने तो लक्षात घेतला पाहिजे.
 प्रशिक्षणार्थाशी प्रशिक्षकांचे संबंध हा एक देखील कळीचा मुद्दा आहे. याबाबत क्रिकेटचं उदाहरण घेता येईल. एखादा विश्वविक्रमी महान फलंदाज किंवा गोलंदाज यशस्वी कप्तान होऊ शकतोच असं नाही. कारण व्यक्तिगत कामगिरी आणि यशस्वी कप्तानी यासाठी भिन्न गुणांची आवश्यकता आहे. एकाच व्यक्तीत ते असू शकतील असं सांगता येणार नाही.
 सचिनसारखा भीमपराक्रम गाजवणारा दिग्गज खेळाडू यशस्वी कप्तान होऊ शकला नाही. क्रिकेटचे समीक्षक म्हणतात की, त्याच्याइतक्याच महान कामगिरीची अपेक्षा त्याने संघातील इतर खेळाडूंकडून ठेवली, पण प्रत्येक खेळाडू त्याच्याइतका महान असू शकत नाही. त्यामुळे खेळाडूंवर दडपण आलं. परिणामी संघाची कामगिरी उंचावू शकली नाही.
 संघाचा कप्तान हा एकापरीने संघाचा शिक्षकच असतो. कारण आपल्या खेळाडूंकडून मैदानात ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे यथायोग्य कामगिरी करून घेण्याची जबाबदारी त्याची असते. ती तो जितक्या अचूकपणे पार पाडील तितकं यश संघाच्या पदरात पडते. यासाठी संघातील खेळाडूंशी त्याचे संबंध आत्मीयतेचे असावे लागतात.

 प्रशिक्षकाच्या बाबतही असेच आहे. तो नुसता ज्ञानी असून भागत नाही. तर विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेप्रमाणे कार्यप्रवण बनवणं, त्यांची कुवत वाढविण्याचा प्रयत्न करणं आणि सर्व विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना निर्माण करणं हा देखील शिक्षकी'चाच एक भाग आहे. थोडक्यात, स्वतःच्या महानतेचं दडपण विद्यार्थ्यांवर येऊ न देता, विद्यार्थ्यांच्या पातळीपर्यंत पोचून त्यांची पातळी उंचावण्याचा प्रयत्न करणं यात शिक्षकाचं खरं कौशल्य दिसून येतं. केवळ उंटावरून शेळ्या हाकण्याची पध्दती यशस्वी ठरत नाही.

संवाद साधण्याची कला/१३२