पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१३३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

व्यवस्थापनशास्त्राचं शिक्षण देणाऱ्या संस्था व महाविद्यालयांचं जणू पेवच फुटलं आहे. एक व्यवस्थापनतज्ज्ञ म्हणून याचा मला एकीकडे आनंद होतोय तर दुसरीकडे चिंताही वाटत आहे.
 व्यवस्थापन शिक्षण ही आता केवळ काही उच्चभ्रूंंची मक्तेदारी राहिलेली नाही. अगदी तळागाळापर्यंत या शिक्षणाबाबत आकर्षण वाटत आहे. व्यावसायिक व्यवस्थापनाला केवळ तांत्रिकच नव्हे तर प्रत्येक क्षेत्राकडून मागणी असल्याने सर्व क्षेत्रांतील व्यवस्थापन तज्ज्ञ ‘तयार' करणाऱ्या संस्था आज प्रत्येक छोट्या-मोठ्या गावांमधून आपल्याला पाहावयास मिळतात. त्यामळे व्यवस्थापन शिक्षणाला सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. वाऱ्याची दिशा ओळखून अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण संस्थेने देशातील जवळ-जवळ ८०० शिक्षण संस्थांना व्यवस्थापन शिक्षण देण्याची अनुमती दिली असून त्यांंच्या अभ्यासक्रमांना मान्यताही दिली आहे. त्यामुळे हे शिक्षण घेऊ इच्छीणार्या कुणालाही ते घेता येऊ लागलं आहे. ‘जागा' भरल्यामुळे प्रवेश मिळाला नाही, असा अनुभव कुणालाही येत नाही याचा मला आनंद आहे.
 संस्था व विद्यार्थी यांची संख्या वाढत असतानाच शिक्षणाच्या दर्जाचं काय होणार ही शंका मला भेडसावते.
 मुलाच्या अभ्यासाबाबत अत्यंत दक्ष असणाऱ्या व त्याने अभ्यास करावा म्हणून सतत त्यावर डाफरणाऱ्या माझ्या एका मित्राला त्याच्या मुलानं विचारलं, ‘बाबा, मला शिक्षण मिळावं असं तुम्हाला वाटतं की पदवी मिळवी असं वाटतं?” हा प्रश्न ऐकून माझा मित्र क्षणभर अवाक् झाला.
 त्यानं गोंधळून विचारलं, “या दोन्हीत फरक काय?” मुलानं शांतपणे सांगितलं, "बाबा, नुसती पदवी घ्यायची असेल, तर कॉलेजला जाण्याची किंवा सखोल अभ्यासाची आवश्यकता नाही. लाईक्ली क्वेश्चन्स' पाठ करून परीक्षेच्या वेळी पेपरमध्ये उतरवले की, हमखास पदवी मिळते. परीक्षेआधी पेपर फुटले, तर हे काम अधिकच सोपं होतं. मात्र, शिक्षण घ्यायचं असेल तर गंभीरपणे अभ्यास करण्याला काही पर्याय नाही. मुलाचे ‘अनुभवी’ बोल ऐकून माझा मित्र गप्प बसला.
 आज व्यवस्थापन शिक्षणासंबंधी अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे सर्वत्र उगवलेल्या व्यवस्थापन शिक्षणसंस्थांपैकी फार थोड्या संस्थाकडे 'शिक्षण' देण्यायोग्य मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत. बाकीच्या केवळ पदवी 'विकणाऱ्या' संस्था झाल्या आहेत.

 या पार्श्वभूमीवर व्यवस्थापन शिक्षणाचा गंभीरपणे विचार होणं आवश्यक आहे. अन्यथा, एक ना धड भाराभर चिंध्या अशी या क्षेत्राची अवस्था होण्याची शक्यता आहे.

व्यवस्थापन शिक्षण :काल,आज व उद्या/१२४