पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१३०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पहिले जाहीर भाषण :
 माझ्या जीवनातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे माझं पहिलं जाहीर व्याख्यान. कोलकाता येथे एका व्यावसायिक संस्थेने माझ्या बॉसचे 'भारतातील कामगार कायदे’ या विषयावर व्याख्यान आयोजित केलं होतं. पण ऐन वेळी बॉसना लंडनला जावं लागल्याने व त्यांचा 'इनचार्ज’ मी असल्याने व्याख्यानाची जबाबदारी माझ्यावरच येऊन पडली. मी कायद्याचा पदवीधर नसल्याने मला या विषयाची काहीच माहिती नव्हती. त्यामुळे कामगार कायद्यातील तरतुदीविषयी बोलणं शक्यच नव्हतं. मी माझं वाचन व सामान्य ज्ञान याचा उपयोग करून कामगार कायदे कसे असावेत याविषयीची माझी मतं व संकल्पना श्रोत्यांसमोर मांडल्या. कशा कुणास ठाऊक, पण त्यांना आवडल्या. बालपणी लागलेली वाचनाची सवय अशी उपयोगी पडली. एका व्याख्याता या नात्याने माझ्या करिअरची ती सुरुवात होती.
व्यवस्थापन प्रशिक्षण :
 व्यवस्थापन प्रशिक्षक म्हणून माझी कारकीर्द सुरू करून देण्याचं श्रेय प्राध्यापक एन.एस. रामस्वामी यांना दिलं पाहिजे. माझ्या वार्षिक सुटीमध्ये त्यांनी मला केरळमध्ये बोलावून ऑटोमेशन, सिस्टिम्स, प्रोसिजर्स व किफायतशीर उत्पादन या विषयांवर माझ्या अनेक कार्यशाळा कोचीनपासून त्रिवेंद्रमपर्यंत आयोजित केल्या. तेव्हापासूनच मी व्यवस्थापकीय प्रशिक्षक म्हणून नावारूपाला आलो. माझ्या करिअरला आणखी एक तेजस्वी पैलू पडला.
 तेव्हापासून आजपर्यंत मी व्यवस्थापकीय प्रशिक्षणाच्या अनेक कार्यशाळा आयोजित केल्या आहेत. अनेक संस्थांमधील व्यवस्थापकांना नवी दृष्टी देण्याचा माझा प्रयत्न आजही सुरू आहे.

व्यवस्थापकीय बोधपट निर्मिती :

 चित्रपट हे केवळ एक करमणुकीचे नव्हे तर लोकशिक्षणाचेही प्रभावी माध्यम आहे. माझा या क्षेत्रात प्रवेश अपघातानेच झाला असं म्हणावं लागेल. मुंबईत राष्ट्रीय केमिकल्स अँँण्ड फर्टिलायझरमध्ये व्यवस्थापनावर कार्यशाळा घेत होतो. त्यावेळी या कंपनीने बोधपट तयार करण्याचं काम हाती घेतलं होतं. प्रशिक्षण कसं दिलं जातं यावर एका प्रसंगाचंं चित्रण त्यांना करावयाचं होतं. माझी कार्यशाळा सुरू असताना त्यांनी वेळ त्याचं चित्रण केले. माझ्या प्रशिक्षणाच्या शैलीने प्रभावीत झाल्याने त्यांनी मला व्यवस्थापन या विषयावर चित्रफीत तयार करण्याची ऑफर दिली. तो वेळपर्यंत मी फक्त पीटर ड्रकर यांनी या विषयावर तयार केलेल्या चित्रफिती पाहिल्या होत्या. आपल्यालाही अशी फिल्म बनविण्याची संधी मिळेल असं स्वप्नातही वाटत नव्हतं.

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/१२१