पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१२९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 त्यावेळी मी नांदेड येथे राहत होतो. तेथून मुंबईला पुन्हा मुलाखतीसाठी येणं अत्यंत कठीण होतं. ‘माझी मुलाखत आजच घेण्याची विनंती केल्यास माझी सोय होईल' असं मी तेथील अधिकाऱ्यांना सांगून पाहिलं, पण ते त्यांच्या मनास येईना. तेथील एका स्टेनोग्राफरने यावर तोडगा काढला. मुलाखत मंडळाचे सदस्य ठराविक वेळाने चहा घेण्यासाठी मुलाखती घेण्याचंं काम थांबवत असत. चहा घेता घेता यांनी माझी मुलाखत घ्यावी असा उपाय त्या स्टेनोग्राफरने सुचविला. तो त्वरित मान्य करण्यात आला.
 दिवसभर मुलाखती घेऊन मंडळाचे सदस्य दमलेले होते. तरीही त्यांनी चहा घेता घेता केवळ पाच मिनिटांसाठी त्यांच्या खोलीत बोलावलं. माझ्या आग्रही भूमिकेमुळे ते थोडेसे कातावले होते.
 "तुम्ही अमेरिकेत जाऊ इच्छिता. अमेरिकेची लोकसंख्या किती, ते तरी तुम्हाला माहीत आहे का?" त्यांच्यापैकी एकाने माझ्या तोंडावर प्रश्न लगावला. मीही थोडा वैतागलेलोच होतो. "मी तेथे अमेरिकेची लोकसंख्या वाढविण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी जात नाहीये!" असं उत्तर एका झटक्यात माझ्या तोंडून बाहेर पडलंं. चहाच्या खोलीत हास्याचे फवारे उडाले. मघाचं तणावयुक्त वातावरण एका क्षणात नाहीसे झालं. त्यानंतर मुलाखत ४५ मिनिटे चालली. माझी निवड करण्यात आली.
 या कहाणीचंं तात्पर्य सर्व व्यवस्थापकांसाठी उद्बोधक आहे. परिस्थिती कितीही कठीण असली, तरी ती आपल्या बाजूने बदलण्याची संधी जरूर मिळते. फक्त त्यासाठी धीर धरला पाहिजे. व्यवस्थापनशास्त्रातील हे मूलभूत तत्व आहे.
कार्नेजी विद्यापीठातले दिवस :
 माझं अमेरिकेतील प्रशिक्षण सुरू झाल्यानंतर माझी प्रथम नौदल संशोधन प्रकल्पााच्या कार्यालयात नियुक्ती करण्यात आली. उत्पादनासाठी लागणाऱ्या वस्तू व मजुरीचा खर्च यावर अहवाल तयार करण्याचं काम माझ्यावर सोपविण्यात आलं होतंं. माझ्या अहवालाच नंतर पुस्तकही काढण्यात आले.

 माझा अहवाल चार वरिष्ठांच्या एका मंडळाने तपासला होता. (या चारांपैकी प्राध्यापक हर्बर्ट सायमन व प्राध्यापक फ्राँँको मोडिग्लिआनी यांना नंतर नोबेल पुरस्कारही मिळाला.)सुरुवातीच्या काळात त्यांनी मला ५० टक्के गुण देऊ केले होते. ५० टक्के गुण काही वाईट नाहीत असं या मंडळाचे मुख्य प्राध्यपक चार्ल्स होल्ट यांनी मला पत्राद्वारे कळविलंं. 'अजून बराच वेळ आहे. माझी टक्केवारी वाढू शकते' असं उत्तर पाठवून मी मोकळा झालो होतो. माझा आत्मविश्वास चांगलाच वधारला होता. आपणही नोबेल प्राईझ मिळवू शकतो असंही वाटू लागलंं होते. तो योग मात्र अजून आलेला नाही.

हितगूज (भाग दुसरा) / १२०