पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/११३

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

भ्रष्टाचार व त्याचे नियंत्रण

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf

र , संस्थेच्या विकासासठी आपण अत्याधुनिक यंत्रसामुग्री विकत घेण्याचा, तसेच संस्थेचे पूर्ण संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतला हि फारच चांगली गोष्ट झाली. आपण दूरदृष्टीचे असल्यानेच हा खर्चिक पण धाडसी निर्णय घेऊ शकला.आम्ही कुशल तंत्रज्ञ आहोत, पण आधुनिक यंत्रे नसतील तर आमच्या ज्ञानाचा उपयोग तरी काय? आता आम्हाला हवी होती तशी नवी यंत्रसामुग्री मिळणार आहे. आम्ही आमचे कौशल्य पणाला लावून संस्थेला टॉपवर नेऊ.मात्र आमची एक मागणी आहे.ही नवी यंत्रं चालविण्यास अवघड असतात.त्यांची हाताळणी काळजीपूर्वक करावी लागते. ते येरागबाळ्याचे काम नाही.‘रफ हॅण्डलिंग' झाल्यास यंत्रं वारंवार बिघडतील व दुरुस्तीचा खर्च वारेमाप होईल. तसं होऊ न देण्याची जबाबदारी आम्ही घेण्यास तयार आहोत.पण त्यासाठी आमच्या पगारात चांगली वाढ केली जावी. म्हणजे आम्हाला अधिक उत्साह वाटेल.'
 वरील संवाद एका कंपनीचे मालक व कंपनीत काम करणारे कुशल तंत्रज्ञ यांच्या बैठकीतला आहे. कंपनीची भरभराट व्हावी व ती स्पर्धेत टिकून राहावी यासाठी मालकांनी नवी यंत्रसामुग्री घेण्याचा व संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. त्याबाबत चर्चा करण्यासाठी त्यांनी आपल्या मर्जीतल्या कुशल तंत्रज्ञांची बैठक बोलावली होती. वास्तविक कंपनी खरेदी करत असलेली यंत्रं चालविण्यास अत्यंत सोपी अशीच होती. त्यासाठी फार कुशल तंत्रज्ञांची आवश्यकता होती असंं नाही. पण कंपनीचे मालक सुशिक्षित व ज्येष्ठ असले तरी आधुनिक यंत्रांबाबतचे त्यांचे ज्ञान यथातथाच होते. हे तेथे काम करणार्या तंत्रज्ञांना चांगलंच ठाऊक होतं. याशिवाय मालक त्यांच्या मर्जीतील काही कर्मचार्यांशी सल्लामसलत करून निर्णय घेतात हेही त्यांना माहीत होते. त्यामुळे या यंत्राचा बागुलबुवा निर्माण करून स्वतःचे उखळ पांढरे करून घेण्याचा त्यांचा प्रयत्न् होता. त्यांचे म्हणणंं ऐकून मालकांनीही विचार केला,'नाही तरी लाखो रुपये खर्च करून आपण मशिनरी घेत आहोत. ती चांगली चालावी यासाठी तंत्रज्ञांच्या पगारात वाढ केली तर बिघडले कुठे? या यंत्रांची जबाबदारी स्वीकारलेल्या तंत्रज्ञांचा पगार जवळजवळ दुप्पट करण्याचा निर्णय मालकांनी त्वरित घेऊन टाकला. तंत्रज्ञांचा डावपेच यशस्वी झाला.

स्रष्टाचारवत्थरचे नियंत्रण/ १०४