पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/११०

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


देऊन मिळविले जाते. डॉक्टरचं व आपलं काम चुटकीसरशी होतं. यात आपण व डॉक्टर अशा दोनच व्यक्तींचा संबंध असतो. अन्य कुणाला त्याची कल्पनाही येत नाही. अशा मर्यादित पातळीवर चालणाऱ्या भ्रष्टाचारास व्यक्तिगत भ्रष्टाचार म्हणतात. याचा अतिरेक झाल्यास तो पुढची सामूहिक पातळी गाठतो.
२.सामूहिक भ्रष्टाचार : एका व्यक्तीस घर बांधण्यासाठी नकाशा मंजूर करून घ्यायचा आहे. या मंजुरीसाठी अनेक अधिकाऱ्यांची मान्यता आवश्यक असते.अशावेळी त्या सर्वांचं समाधान करणं भाग असतं. हे सामूहिक भ्रष्टाचाराचं उदाहरण आहे.
३. शिस्तबध्द भ्रष्टाचार : सामूहिक भ्रष्टाचाराच्या पुढची अवस्था म्हणजे शिस्तबध्द भ्रष्टाचार. यात पैसे घेणाऱ्यांची एक साखळी असते. कोणतेही काम समूहाने व शिस्तबध्द रीतीने केलं की ते हमखास यशस्वी होतं हे तत्त्व यामागे असतं.या प्रकारात काम करून देणाऱ्या व्यक्ती कधीही थेट पैसे स्वीकारत नाहीत, तर ते एका ठराविक व्यक्तीकडे देण्यास सांगण्यात येतं.अशा प्रकारे जमा झालेली रक्कम ठराविक दिवशी ठराविक ठिकाणी या साखळीतील प्रत्येकास त्याच्या त्याच्या अधिकाराच्या पातळीनुसार वाटली जाते. सरकारी महसूल विभागात या पध्दतीच्या भ्रष्टाचाराचा अनुभव येतो.
 या साखळीत एखाद्या प्रामाणिक माणसाचा शिरकाव झाला की, ती तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा माणसांना इथे थारा दिला जात नाही. दारू पिणाऱ्या अनेक व्यक्तींमध्ये एखादा न पिणारा अडचणीचा ठरतो. त्याच्यामुळे 'पार्टी'चा बेरंग होतो.त्यामुळे एक तर अशा माणसाला कटवावं लागतं किंवा त्याला ‘तीर्थप्राशना'ची दीक्षा द्यावी लागते. शिस्तबध्द साखळी पध्दतीने चालणाच्या भ्रष्टाचारातही असंच होतं.
अप्रत्यक्ष भ्रष्टाचार :
 भ्रष्टाचार समाजात कितपत स्थिरावला आहे हे या प्रकारच्या भ्रष्टाचाराच्या प्रमाणावरून ओळखलं जातं. या प्रकारात फायदा मिळवून देणारी स्थानं किंवा कंत्राटे यांचा अक्षरशः लिलाव केला जातो. उदाहणार्थ ऑक्ट्रॉय गोळा करण्याचं कंत्राट किंवा देशी दारु वितरणाचं कंत्राट.कंत्राट घेऊ इच्छिणाऱ्याला त्यासाठी आवश्यक ते कायदेशीर शुल्क भरावं लागतं. पण कंत्राट मिळविण्यासाठी अधिकाऱ्यांना लाचही द्यावी लागते. जो सर्वात जास्त लाच देईल त्याला कंत्राट देण्यात येतं असं बोललं जातं.

 वर सागिंतलेले तसेच मागच्या लेखात दिलेले भ्रष्टाचाराचे प्रकार औद्यागिक संस्थांमध्येही मोठ्या प्रमाणावर चालतात. संस्थांतर्गत भ्रष्टाचार पूर्णपणे थांबवणं अशक्य असलं तरी त्याला लगाम घालुन त्याचं प्रमाण कमीत कमी ठेवणं व संस्थेचे भवितव्य सुरक्षित ठेवणं हे व्यवस्थापनासमोरचं कठीण व नाजूक आव्हान असतं. संस्थेत चालणाऱ्या भ्रष्टाचाराशी लढा देण्याच्या मार्गाचा विचार करण्यापूर्वी व्यवस्थापकीय पातळीवरून चालणाऱ्या भ्रष्टाचाराबाबत व भ्रष्ट व्यवस्थापकांच्या वर्तणुकीबाबत माहिती

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची /१०१