पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१०६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

क्षमता या रत्नांमध्ये होती. पण, त्याबरोबरच अतिजहाल विषही बाहेर पडलं होतं, ते म्हणजे भ्रष्टाचाराचं! मात्र देव-दानवांच्या समुद्रमंथनातून निघालेल्या विषाला शंकराचा 'उतारा’ मिळाला तसा या भ्रष्टाचाराच्या विषाला मिळाला नाही. त्यामुळे गेल्या १० सहस्रकांमध्ये हे विष मानवात चांगलं भिनलं आहे.
 मानवाने विकसित केलेल्या राजकारणापासून उद्योग-व्यवसायापर्यंत आणि शिक्षणापासून समाजसेवेपर्यंत सर्व क्षेत्रांत त्याचा सुखनैव संचार होत आहे. याची पाळेमुळे इतकी मजबूत आहेत की, ते नाहीसे करण्याची भाषा केव्हाच संपली आहे. आता केवळ त्याला पायबंद घालून नियंत्रणाखाली ठेवण्याची भाषा होत आहे आणि तसंही कित्येकदा शक्य होत नाही.
 याबाबत एक गमतीशीर प्रसंग आठवतो. दोन वेळा देशाचे कार्यकारी पंतप्रधानपद सांभाळलेले थोर गांधीवादी गुलझारीलाल नंदा प्रथम केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री झाले. तेव्हा त्यांनी पाच वर्षांत भ्रष्टाचार खतम करण्याची घोषणा केली होती. मात्र दोन वर्षात त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. तेव्हापासून कोणत्याही मंत्र्याने भ्रष्टाचार पूर्णपणे नाहीसा करण्याची भाषा केलेली नाही.
 तर असा हा भ्रष्टाचार सर्वांच्याच गळ्यात अडकलेलं हाडूक बनला आहे. ते गिळताही येत नाही आणि थुंकताही येत नाही.
 'भ्रष्टाचारामुळे देशाची नासाडी होत आहे. ही कीड नाहीशी झालीच पाहिजे. भ्रष्टाचार्यांना फासावर लटकविल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही' असे जवळपास प्रत्येकजण संधी मिळेल तेव्हा बेंबीच्या देठापासून ओरडत असतो. मात्र, संधी मिळाल्यास स्वतः वाहत्या गंगेत हात धुऊन घेण्यास मागेपुढे पाहत नसतो. तेव्हा जाहीररीत्या कोणालाही नको असणारा, पण खासगीत हवाहवासा वाटणारा हा भ्रष्टाचार अनादिकाळापासून होत आला आहे आणि अनंत काळपर्यंत चालत राहण्याची शक्यता आहे.
 'पाण्यातील मासा पाणी कधी पितो, ते पाण्याखेरीज कुणालाही कळत नाही. तसंच सरकारी अधिकारी भ्रष्टाचार कधी आणि कसा करतो हे इतरांना समजू शकत नाही' असं दोन हजार वर्षांपूर्वी आर्य चाणक्याने म्हणून ठेवलं आहे. भ्रष्टाचाराला 'सुसंस्कृत' मानवाच्या इतिहासाइतकाच जुना इतिहास आहे हे यावरून स्पष्ट होते.

 एखाद्या डेरेदार रसरशीत वृक्षाला बांडगूळ लागावं किंवा गाईच्या भरल्या कासेला गोचीड चिकटावं, तसा समृध्द व संपन्न मानवी संस्कृतीला भ्रष्टाचार बिलगून आहे.काबाडकष्ट करून कुटुंब पोसणाऱ्या आदर्श पत्नीच्या पैशावर दारू ढोसणारा आणि वर तिलाच मारहाण करणारा पती असंही भ्रष्टाचाराचं वर्णन करता येईल. तो सुधारत नाही आणि ती त्याला सोडत नाही. असा हा संसार गेली दहा हजार वर्षे अखंड सुरू सुरू

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची /९७