पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१०५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शास्त्र भ्रष्टाचाराचे


पल्या प्राचीन धर्मग्रंथांमध्ये ‘समुद्रमंथना'ची कथा आहे. देव आणि दानव यांनी मेरू पर्वताची रवी करून घनघोर समुद्रमंथन केले, तेव्हा समुद्रातून लक्ष्मी,कौस्तुभ, पारिजातक, सुरा, धन्वंतरी, चंद्र, अमृत इत्यादी मौल्यवान रत्नं व उपयुक्त वस्तू बाहेर पडल्या, पण त्याचबरोबर ‘हलाहल’ नावाचे अतिभयानक विषही बाहेर पडलं. त्याची तीव्रता इतकी होती की, समुद्रमंथनातून हाती आलेल्या अमृताचाही प्रभाव नाहीसा होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. समुद्रमंथन करणारे देव व दानव हे देखील भयभीत झाले. इतर सर्व वस्तूंची ‘वाटणी’ करून घेण्यामध्ये त्यांच्यात अहमहमिका होती, पण विषाची जबाबदारी स्वीकारण्यास कोणीच तयार होईना. अखेर सर्व जण कोणत्याही मोहपाशात न अडकलेल्या आणि अंगाला राख फासून बसलेल्या साधुवृत्तीच्या निर्मोही व निरिच्छ अशा शंकराला शरण गेले आणि त्याने ते विष प्राशन करून देव-दानवांची आणि जीवसृष्टीचीही सुटका केली.

 मानवाच्या इतिहासात सुमारे १० हजार वर्षांपूर्वी असं वैचारिक ‘समुद्रमंथन' झालं होतं. त्यातून शेती आणि पशुपालन या व्यवसायांची रत्ने बाहेर पडली होती. संपत्ती, मालमत्ता व मालकी हक्क या संकल्पना बाहेर पडल्या होत्या. आहार, निद्रा, भय व मैथुन या चार गोष्टींखेरीज इतर विचार न करणारा व सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत याच विवंचनेत असणाऱ्या मानवाला सुस्थिर बनविण्याची आणि त्याची चहूअंगानी प्रगती करण्याची






शास्त्र भ्रष्टाचाराचे / ९६