पान:अकबर.pdf/६०

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५३
भाग ६ वा.

नंतर ( आगष्ट १९५३ ) त्यास मक्केस हद्दपार केलें. चार वर्षांनंतर तो तेथेच मरण पावला. हुमायुनचा दुसरा भाऊ हिंदाल मिरझा अठरा महिन्यापूर्वी कामरानाचा पाठलाग चालला असतां मारला गेला होता. राहिलेला भाऊ अस्कारी मिरझा. दगलबाजी ही त्याच्या हाडामासांतच खिळलेली होती. त्यास इ० स० १५५१ त मक्केस हद्दपार करून दिले. तो तेथें सात वर्षे राहिला पण उपद्रव देण्याचे सामर्थ्यच त्याचे अंगी राहिले नव्हते. याप्रमाणे भावांच्या त्रासांतून मुक्त झाल्यावर हुमायुनाच्या मनांत काश्मीर जिंकण्याचे विचार येऊ लागले. परंतु त्याचे अमीर उमराव, सरदार व सैनिक या मोहिमेस इतके प्रतिकूल होते की त्यास आपला बेत मोठ्या कष्टाने सोडून द्यावा लागला. तथापि तो सिंधुनद ओलांडून गेला व त्यांतच समाधान मानून राहिला. सिंधु व जेहलम यांच्या मधील प्रदेशांत तळ देऊन राहिला असतां पेशावर येथील किल्ला दुरस्त करण्याचा हुकूम त्याने फरमाविला. ही दुरस्ती म्हणजे एक प्रकारे तो किल्ला प्रचंड प्रमाणावर पुनः बांधणेच होतें. यावेळी देखील हिंदुस्थानावर स्वारी करण्याचे त्याच्या मनात घोळत होते ; आणि म्हणून डोंगरांतील वाट उतरून हिंदुस्थानांत आपले सर्व सेन्य एके ठाण्यावर गोळा करितां येईल असे सुरक्षित स्थळ आपले ताब्याखाली असावे अशी त्याची उत्कट इच्छा होती व ती तृप्त करण्यास तो फार आतुर झाला होता. म्हणून हे दुरस्तीचे काम इतक्या झपाव्याने चालविले होते की साल अखेरीस किल्ला अगदी तयार झाला. इकडे हिंदुस्थानांत पुढील हिवाळ्यांत व वसंत कालाच्या आरंभी असे कांही आणीबाणीचे प्रसंग येऊन गुदरले की त्या योगाने हुमायुनास आप मनोरथ सिद्धीस नेण्यास चांगली संधि मिळाली.