पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/९८

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


'तुमची सगळ्यांची जमिनीवर राहायला जायची तयारी झाली, म्हणजे मला निरोप द्या,' असे म्हणून मी भूमिपुत्रांचा निरोप घेतला. एक धडा शिकून. यापुढे लोकांचे भले करण्याचे प्रयत्न बंद. भिकेच्या आणि मदतीच्या प्रकल्पांतून गरिबीचा प्रश्न सुटत नाही. वर्षानुवर्षे गावागावातील गरिबी संपवण्याबद्दल जो मार्ग मनात शंकासुद्धा न आणता मी मानला होता, त्याबद्दलच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. पुन्हा एकदा शून्यावर आलो होतो. स्वित्झर्लंडला परत जाण्याचा मोह मी कसा टाळला कुणास ठाऊक! (अंगारमळा, पृष्ठ १४-५)

 ग्रामविकासाचे हे प्रयत्न चालू असतानाच दुसरीकडे जोशींची शेतीदेखील चालूच होती. भारतातील शेती बव्हंशी कोरडवाहू आहे; पण अशा कोरडवाहू शेतीतही पुरेसा पैसा गुंतवला, उपलब्ध तंत्रज्ञान वापरले, आपल्या शिक्षणाचा उपयोग करून चांगले व्यवस्थापन केले तर ती शेती फायदेशीर होऊ शकते का ह्याचा त्यांना शोध घ्यायचा होता. किंबहुना, शेतीत पडण्यामागे त्यांचा तोच खरा उद्देश होता. त्या दृष्टीने सतत काही ना काही नवे प्रयोग ते करत असत. शेतीतील कामाबद्दल जे काही वाचनात यायचे, कानावर पडायचे त्याचा अवलंब स्वतःच्या शेतीत करून बघत. कधी हे बियाणे वापर, कधी त्या कंपनीचे बियाणे घे; कधी हे खत, कधी ते औषध. कधी असे पाणी द्या, कधी तसे द्या. सारखे काहीतरी नवे करून बघायचे, आपला अनुभव हाच आपला गुरू मानायचा असे त्यांनी ठरवले होते.
 लौकर येणारे आणि रोख पैसे देऊ शकणारे पीक म्हणून खरिपाच्या पहिल्याच हंगामात जोशींनी खीरा जातीच्या काकडीचे पीक घेतले. तीन-एक महिन्यांत पाच-सहा पोती काकडी निघाली, ती अडत्याकडे पाठवून दिली. विक्रीचा खर्च वजा जाता १८३ रुपये मिळाले. शेतीतली ती पहिली कमाई. नाही म्हटले तरी जोशींना आनंद झाला. दुसऱ्या वेळीही असेच काहीतरी दीड-दोनशे रुपये आले. पण तिसऱ्या वेळी त्यांना वेगळाच अनुभव आला. ह्यावेळी त्यांनी लागवडीचे क्षेत्र वाढवले होते. दहा पोती काकडी आली, ती पुण्याला अडत्याकडे पाठवून दिली. तीन-चार दिवसांनी, आता यात निदान तीनशे रुपये तरी फायदा होईल या अपेक्षेने ते पुण्यातील अडत्याच्या (दलालाच्या) ऑफिसात गेले. जरा वेळाने तेथील कारकुनाने त्यांच्या हातात एक लिफाफा कोंबला आणि ३२ रुपयांची मागणी केली. "हे कसले पैसे द्यायचे?" त्यांनी आश्चर्याने विचारले.
 "लिफाफा उघडा म्हणजे कळेल." कारकुनाने उत्तर दिले.
 उभ्याउभ्याच जोशींनी लिफाफा उघडला व आतला कागद बाहेर काढला. त्यावर जो हिशेब खरडला होता, त्याचा सारांश होता : 'वाहतूक, हमाली, दलाली, वजनकाटा, मार्केट कमिटीचा चार्ज आणि मुख्यमंत्री फंडाला द्यायचे पैसे हे पकडून एकूण खर्च इतका इतका; काकडी विकून आलेले पैसे इतके इतके; तुमच्याकडून येणे रुपये ३२.'

 जोशींनी कपाळावर हात मारून घेतला. शेतावर तीन महिने राबून काढलेल्या काकडीचे

९८अंगारवाटा... शोध शरद जोशींचा