पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/८०

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


चिप्स फॅक्टरी नावाची एक वेफर्स बनवायची फॅक्टरी बघायची होती. त्यानुसार तो स्वित्झर्लंडला आला, ठरल्याप्रमाणे बर्नला माझ्याच घरी राहिला. मी त्यापूर्वीच तिथल्या मॅनेजमेंटला फोन करून अपॉइंटमेंट घेऊन ठेवली होती. दुसऱ्या दिवशी मीच त्याला त्या फॅक्टरीत घेऊन गेलो. पूर्ण दिवस आम्ही त्या फॅक्टरांमध्ये घालवला. सगळं बघण्यात आणि चर्चा करण्यात. तिथल्या अधिकाऱ्यांनी आमचं चांगलं स्वागत केलं. विशिष्ट प्रकारचे बटाटे कसे व कुठून मिळवले जातात, ते भरपूर पाण्याने कसे धुतले जातात, नंतर ते कसे सोलले व कापले जातात, कसे तळले जातात, त्यांची चव कशी तपासली जाते, दर्जा कसा कायम राखला जातो. तयार वेफर्सचं पॅकिंग कसं केलं जातं, त्यावरचा मजकूर कसा छापला जातो, तो तयार माल कसा वितरीत केला जातो हे सगळं त्यांनी आम्हाला दाखवलं. शरदला असं काहीतरी भारतात सुरू करायचं होतं. पण प्रत्यक्षात असं काही करणं त्याच्या परिस्थितीत अशक्य आहे असा निष्कर्ष त्याने शेवटी काढला."
 पुढे टोनी म्हणाले,
 "१९७८ सालातील त्याच्या त्या भेटीनंतर पुन्हा पुढली ३४ वर्ष आमचा काहीच संबंध आला नाही. त्याच्या मुली मात्र अधूनमधून आमच्या संपर्कात होत्या. मग गेल्या महिन्यात अगदी अचानक त्याची इमेल आली व तुम्ही त्याचं चरित्र लिहीत आहात व त्या संदर्भात मला भेटू इच्छिता हे त्यानी कळवलं. तुमच्याशी झालेल्या ह्या चर्चेमुळे आज इतक्या वर्षांनी त्या सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. एका उमद्या, बुद्धिमान मित्राबरोबर आठ वर्षं मी काम केलं, त्यांतील सात वर्षंतर त्याचा अगदी जवळचा शेजारी म्हणूनही राहिलो, त्याचा व त्याच्या सगळ्या कुटुंबाचा भरपूर सहवास मिळाला ह्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो."
 ह्या भेटीच्या वेळी व नंतरदेखील टोनी यांनी जे मनःपूर्वक सहकार्य दिले, त्याबद्दल त्यांचे आभार मानावेत तेवढे थोडेच होतील. आमच्या भेटीची मी लिहिलेली टिपणांची १८ पानेदेखील त्यांनी कंटाळा न करता व्यवस्थित तपासून दिली. शरद जोशी यांच्या जीवनातील हे बहुतांशी अज्ञात राहिलेले पर्व त्यांच्यामुळेच माझ्यापुढे साकार झाले.

 आयुष्याच्या ऐन उमेदीत स्वित्झर्लंडसारख्या एखाद्या देशात आठ वर्षे सहकुटुंब राहताना, वरिष्ठपदी काम करताना जोशींच्या संवेदनशील मनावर अनेक संस्कार होणे अगदी स्वाभाविक आहे. असे कुठले वैचारिक संस्कार ह्या कालावधीत त्यांच्यावर झाले असतील, ह्याचा विचार करताना व त्यांचा भावी जीवनातील वाटचालीशी संबंध जोडताना चार मुद्दे सर्वाधिक महत्त्वाचे वाटतात.
 इथल्या वास्तव्यात पटलेला व भावी जीवनावर प्रभाव टाकणारा पहिला मुद्दा म्हणजे आर्थिक समृद्धीचे मानवी जीवनातील सर्वस्पर्शी महत्त्व.

 इथली डोळे दिपवणारी समृद्धी ही केवळ आर्थिक नव्हती; तिचे पडसाद जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत उमटताना दिसत होते. शिस्तबद्ध वाहतूक, लोकांचे एकमेकांशी असलेले समंजस

८०अंगारवाटा... शोध शरद जोशींचा