पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/७६

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


जगण्यात मात्र अगदी चैनीत राहायचे! ह्या सर्व ढोंगबाजीची जोशींना घृणा वाटू लागली.
 सुरुवातीला खूप मानाच्या आणि महत्त्वाच्या वाटलेल्या युएनमधील नोकरीत पुढे आपल्याला वैयर्थ्य का जाणवू लागले याची काही कारणे स्वतः जोशी यांनी योद्धा शेतकरी या पुस्तकात उद्धृत केलेल्या संभाषणात व इतरत्रही नमूद केली आहेत. त्यांच्या मते बाहेरून पाहणाऱ्याला असे वाटत असते, की या संयुक्त राष्ट्रसंघात फार महत्त्वाचे असे काही काम चालले आहे. पगारवगैरे उत्तमच असतो. पण संयुक्त राष्ट्रसंघाला प्रत्यक्ष अधिकार असे फारसे नसतात. वेगवेगळ्या देशांचे धोरण शेवटी ते ते देशच ठरवत असतात. संयुक्त राष्ट्रांमध्ये जेव्हा 'सेकंड डेव्हेलपमेंट डिकेड'चे काम सुरू झाले – म्हणजे 'विकासाच्या दुसऱ्या दशकाची' आखणी सुरू झाली – तेव्हा ह्या संघटनेतून बाहेर पडावे, असे विचार त्यांच्या मनात येऊ लागले. 'विकासाचे दुसरे दशक' म्हणजे नेमके काय? विकासाचे पहिले दशक' तरी कुठे नीट पार पडले आहे? मग लगेच हे दुसरे दशक सुरू करायची भाषा कुठून आली? – असे प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाले.
 युएनतर्फे राबवला जाणारा 'विश्वव्यापी तांत्रिक साहाय्य' किंवा 'टेक्निकल असिस्टन्स' नावाचा जो कार्यक्रम आहे. तो म्हणजे एक फार मोठी बनवाबनवी आहे. खोटेपणा आहे हेही त्यांना कळून चुकले. ह्या तांत्रिक' साहाय्यातील फार मोठी रक्कम ह्या सल्लागारांच्या भरमसाट पगारातच जाते, आणि प्रत्यक्षात ज्यांना फायदा व्हावा म्हणून हा निधी उभा केला जातो, त्यांना जे हवे ते कधीच मिळत नाही.
 ह्याशिवाय, आणखीही एक भयानक गोष्ट त्यांच्या लक्षात आली. ती म्हणजे हे सारे वास्तव उघडउघड दिसत असूनही गरीब देशांतले सारे अर्थतज्ज्ञ, राज्यकर्ते, विचारवंत त्याकडे पूर्ण डोळेझाक करतात व जी भूमिका घेण्याने स्वतःचा फायदा होईल, स्वतःला आंतरराष्ट्रीय परिषदांचे आमंत्रण येईल, पुरस्कार मिळतील तीच भूमिका घेतात. स्वार्थापोटी आपली बुद्धी त्यांनी चक्क गहाण टाकलेली असते. आपली सध्याची नोकरी म्हणजेदेखील अप्रत्यक्षरीत्या ह्याच सगळ्या भ्रष्ट यंत्रणेचा एक भाग आहे, असेही त्यांना वाटू लागले.

 एकीकडे त्यांचे वाचन व चिंतन सतत चालूच होते; भारतातील गरिबीचा प्रश्न हा शेतीमालाला मिळणाऱ्या अत्यंत अपुऱ्या किमतीशी निगडित आहे हे त्यांच्या लक्षात आले होते; पण त्यावर युएनमध्ये काहीच चर्चा होत नव्हती. ह्या सगळ्याचा जोशींना अगदी उबग आला. जोशी म्हणतात,

 "दारिद्र्याच्या प्रश्नावर उत्तर शोधण्याचा खराखुरा प्रयत्न कुणी केलेलाच नाही, हेदेखील माझ्या ध्यानात यायला लागलं! मी वेगवेगळे अहवाल आणि ग्रंथ वाचू लागलो, तेव्हा ह्या दारिद्र्याच्या प्रश्नाचं मूळ टाळून development techniques, linear programming equations वगैरे जडजंबाल शब्दांमध्ये जे काही लिहिलं जायचं, वाचायला मिळायचं, ते अगदी खोटं आहे हे प्रकर्षाने जाणवू लागलं. असे अहवाल आणि पुस्तकं लिहिणारे विशेषज्ञ हे दारिद्रयाच्या मढ्यावर चरणारे लोक आहेत, ह्याबद्दल माझ्या मनात काहीही शंका उरली नाही!

७६अंगारवाटा... शोध शरद जोशींचा