पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/७३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खंडातून आलेली आहे याचा विचार व्हायचा. मग देशाचा विचार व्हायचा. मग राष्ट्रीयत्वाचा विचार व्हायचा. मग वर्णाचा विचार व्हायचा. आणि आता आणखी एका गुणाचा विचार होतो - तो म्हणजे त्या व्यक्तीच्या धर्माचा!' ह्याविरुद्ध तक्रार करायचं त्याने ठरवलं.
 "जिनिव्हाला इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनचं एक अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल आहे. युएनच्या कुठल्याही शाखेतील कर्मचाऱ्यावर काही अन्याय होत असेल तर तो तिथे दाद मागू शकतो. आपल्याला पात्रता असूनही प्रमोशनसाठी डावललं जात आहे अशा प्रकारचं निवेदन त्याने ह्या ट्रायब्युनलपाशी दिलं होतं. त्या संदर्भात त्याला ट्रायब्युनलने त्याची बाजू ऐकून घ्यायला बोलावलंही होतं. पण दुर्दैवाने त्याची बाजू ट्रायब्युनलला पटली नाही व ती केस डिसमिस केली गेली.
 "आज मागे वळून बघताना मला वाटतं, की त्याने जर अजून थोडा धीर धरला असता, तर त्याला प्रमोशन नक्की मिळालं असतं; जसं ते रुटीनमध्ये मलाही मिळत गेलं. इथे राहिला असता, तर तो माझ्याही वर, अगदी असिस्टंट डायरेक्टर जनरलच्या लेव्हलपर्यंत गेला असता. पण त्याने नोकरी सोडायचाच निर्णय घेतला.
 "दुसरी एक घटना इथे नमूद करावीशी वाटते. शरद काही खूप चांगला ड्रायव्हर नव्हता; मी म्हणेन तो अॅव्हरेज ड्रायव्हर होता. एकदा गाडी चालवत असताना त्याच्या गाडीला गंभीर अपघात झाला होता. सुदैवाने त्याला स्वतःला काही दुखापत झाली नव्हती, पण त्याच्या मोटारीचं जबरदस्त नुकसान झालं होतं. माझ्या आठवणीप्रमाणे ती दुरुस्त करायचं गराजचं बिल ७००० स्विस फ्रैंक्स की असंच काहीतरी आलं होतं. तेवढे पैसे इन्शुरन्स कंपनी देणं शक्यच नव्हतं. 'माझं सगळं सेव्हिंग ह्यात गेलं' असं तो मला म्हणाल्याचं आठवतं. ह्या अपघातामुळे तो चांगलाच हादरला होता आणि ते तसं स्वाभाविकच होतं.
 “एकूणच युएनच्या कामाबद्दल तो असमाधानी होता. आमचं बरचसं बजेट हे आमचे पगार, सल्लागारांचा मेहेनताना, प्रवास, हॉटेल, भव्य कार्यालय, डामडौल वगैरेवरच खर्च होतं; त्यातून गरीब देशांचं काहीच कल्याण होत नाही, अशी त्याची धारणा बनत चालली होती व त्यात तथ्यही होतंच.
 "तरीही त्याने ही नोकरी सोडून भारतात जाऊ नये, इथेच त्याचा व त्याच्या कुटुंबीयांचाही उत्तम व्यक्तिगत विकास होऊ शकेल असं त्याला मी समजावलं. युएनमधील नोकरीमुळे काळाच्या ओघात त्याला स्वीस नागरिकत्वदेखील मिळू शकलं असतं. पण तसा तो निश्चयाचा पक्का होता व शेवटी त्याच्या मनाप्रमाणेच तो भारतात परत गेला."

 जोशींच्या बर्नमधील कामाचे स्वरूप जुलै १९६९नंतर अधिक व्यापक झाले होते. युपीयुमधील नेहमीचे काम होतेच; पण त्याशिवाय युएनच्या विविध शाखा विकासासाठी जे कार्यक्रम जगभर राबवत होत्या, त्या कार्यक्रमांच्या आखणीसाठी आवश्यक त्या सामाजिक-आर्थिक पाहण्या करणे, त्यांना संख्याशास्त्रीय मदत करणे हाही आता त्यांच्या कामाचा एक भाग होता. त्यासाठी जगभर प्रवासही करावा लागे. हे सारे करताना जे त्यांच्या लक्षात येत

डोंगरकुशीतल्या नंदनवनात७३